ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनामुळे सध्या कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांचा यावर विश्वासच बसत नव्हता. पण, ही गोष्ट पचवणं कितीही कठीण असलं तरीही आता त्या आपल्यात नाहीच हेच खरं. रिमाताईंसोबत स्क्रीन शेअर केलेल्या बऱ्याच कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनीही दुरध्वनीवरुन रिमाताईंच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं आहे.

‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांतून आलोकनाथ आणि रिमा प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. रिमाताईंच्या निधनाची बातमी जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या भावना अनावर झाल्या. ‘ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. काय बोलावं काहीच सुचत नाहीये. एक अभिनेत्री म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सुरेख होता. ही अत्यंत दु:खद बाब आहे.’ असं म्हणत आलोकनाथ यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

वाचा: Reema Lagoo : ..आणि प्रेक्षक रिमालाच समजू लागले सलमानची खरी आई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९० च्या दशकामध्ये बडजात्या यांच्या निर्मितीअंतर्गत साकारलेल्या चित्रपटांमध्ये आलोकनाथ आणि रिमाताईंनी कौटुंबिक मुल्यांचं प्रभावीपणे सादरीकरण केलं होतं. रिमा म्हणजे कलाकारांची आणि प्रेक्षकांची सर्वाधिक आवडती ऑनस्क्रीन ‘आई’. त्यांनी साकारलेली ‘आई’ आणि ‘विहिणबाई’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातूनच त्यांनी आईची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. पण, खऱ्या अर्थाने या आईला प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे सलमानच्या आईच्या भूमिकांपासून. हिंदी चित्रपटांतून कौटुंबिक मुल्यांची नव्याने मांडणी करत आलोकनाथ यांनी साकारलेली ‘बाबुजीं’ची भूमिका आणि रिमाताईंनी साकारलेली ‘आई’ची भूमिकांना या बॉलिवूडरुपी कुटुंबात फार महत्त्व आहे.