अभिनेता अमित सध त्याच्या चौकटीबाहेरच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. सध्याच्या घडीला हा अभिनेता ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे. पण, चित्रीकरणाच्या निमित्ताने परदेशी गेलेल्या या अभिनेत्याला एक विचित्र आणि निराशाजनक अनुभव आला. सोमवारी सकाळी अमित जेव्हा हॉटेलमधून बाहेर येत होता तेव्हा त्याची बाईक हॉटेलच्या कंपाऊंडमध्ये नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. अमितने लगेचच ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली.

‘गोल्ड’च्या सेटवर बाईकने जाणाऱ्या अमितने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय, ‘सकाळी साडेपाचच्या सुमारास मी गोल्डच्या सेटवर माझ्या ट्रायम्फ बाईकने जाण्यासाठी सज्ज होतो. पण, माझ्या लक्षात आलं की बाईक त्या ठिकाणी नाहीये. मी आशा करतो की बाईक लवकर मिळेल.’ हे ट्विट करत अमितने एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बाईक राईडसाठी सज्ज असलेला अमित पाहायला मिळतोय. यामागोमागच त्याने आणखी एक ट्विट करत ‘ट्रायम्फ टी१२०’ हरवल्यासंबंधीची निराशा आणि चिडचीड व्यक्त केली. खिलाडूवृत्तीच्या अमितला अॅडव्हेन्चर्स आणि बाईक रायडींगची बरीच आवड आहे हे त्याचे सोशल मीडिया अकाऊंट पाहता लक्षात येतंच. त्यामुळे आता ट्रायम्फसारखी सुरेख बाईक हरवल्यामुळे त्याने खंत व्यक्त केलीये. अमितला त्याची बाईक आता परत मिळणार का हाच आता महत्त्वाचा प्रश्न आहे.

वाचा : …म्हणून कटप्पाच्या मुलीने लिहिलं मोदींना पत्रं

दरम्यान, ‘सरकार ३’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अमित गोल्ड या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिमा कागतीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या ‘एक्सेल एण्टरटेन्मेन्ट’ बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘गोल्ड’ हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. स्वतंत्र भारताच्या खात्यात पहिल्या ऑलिम्पिक पदकाची कमाई कशा प्रकारे झाली होती याची मांडणी या चित्रपटाच्या कथानकातून करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.