सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही ज्येष्ठ अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन. विविध विषयांवर, संवेदनशील मुद्द्यांवर आणि महत्त्वाचे संदेश देण्यासाठी बिग बी नेहमीच ट्विट करत असतात. त्यांच्या ट्विटला अनेकांचे लाइक्सही असतात. त्याशिवाय त्यांचे ट्विट बऱ्याचदा रिट्विटही केले जातात. पण, सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट ही अनिश्चितच असते, याचा प्रत्यय खुद्द बिग बींनाही आला असावा. महिला सबलीकरणाचा मुद्दा नेहमीच प्रकाशझोतात आणणाऱ्या अमितजींना याच एका मुद्द्यामुळे नेटिझन्सच्या बऱ्याच प्रश्नांचा सामना करावा लागला आहे.

अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने ट्विटरवर त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये खुद्द बिग बींसह चित्रपटाच्या टीममधील सर्व पुरुष मंडळी दिसत असून, मुख्य भूमिकेत झळकलेल्या तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी, अँड्रिया टेरियांग यांच्यापैकी एकही अभिनेत्री पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे बऱ्याच ट्विटर युजर्सनी बिग बींच्या या ट्विटविषयी काही प्रश्न उपस्थित केले.

‘द टीम पिंक’, असं म्हणत बच्चन यांनी तो फोटो पोस्ट केला. ‘सगळे एकाच फ्रेममध्ये… सगळेच स्वावलंबी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते’ असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर बऱ्याचजणांनी त्यांना चित्रपटाच्या यशाबद्दल शुभेच्छाही दिल्या. पण, काही युजर्सनी मात्र वेगळीच गोष्ट हेरली.

‘पिंक गर्ल्स कुठे आहेत?’, असा प्रश्न एका युजरने केला. तर दुसऱ्या एकाने ‘स्वत:च्या बळावर लढा जिंकलेल्या त्या मुली आहेत तरी कुठे? कृपया त्यांच्यासह हा फोटो रिपोस्ट करावा’, असं म्हटलं. तर काही युजर्सनी ‘या ट्विटमुळे एक चुकीचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचतोय’ असं म्हणत बच्चन यांना पेचात पाडलं. त्यामुळे आता ट्विटर युजर्सना ते काय उत्तर देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात