गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये पावसाचा जो तडाखा पाहायला मिळाला होता, अगदी तसाच तडाखा मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. मंगळवारी दुपारी सुरु झालेल्या पावसाचं मुंबईतील एकूण प्रमाण पाहता गेल्या दहा वर्षांत सप्टेंबर महिन्यात कालच्या दिवशी सर्वात जास्त पाऊस पडल्याचंही स्पष्ट झालं. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. वाहतूक कोंडी, वादळी वाऱ्यांमुळे झालेली झाडांची पडझड आणि तुंबलेली मुंबई हे चित्र पुन्हा पाहायला मिळालं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. पण, वेधशाळेने येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सर्वत्र भितीचं आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. फक्त सर्वसामान्य मुंबईकरच नाही. तर चित्रपटसृष्टीतील कलाकारही आता निसर्गाच्या या करणीला घाबरले आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करत आपल्या मनातील भीती व्यक्त केली. यावेळी त्यांनी तुंबलेल्या रस्त्यांचा किंवा मुंबईतील गर्दीचा फोटो पोस्ट न करता गणरायाचरणी नतमस्तक होतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सर्व देव पुन्हा रागावले आहेत वाटतं…. ‘असं म्हणत अतिशय सूचक ट्विट करत बिग बींनी या प्रसंगी त्यांच्या मनातील भाव व्यक्त केले.
T 2552 – The God's they be angry again .. ! They thunder and lightning loud and now it pours here in Mumbai .. be safe remain in the house pic.twitter.com/piyizzuczb
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 19, 2017
तर नृत्य दिग्दर्शिका फराह खानचा पती दिग्दर्शक शिरिष कुंदरनेही मुंबईच्या पावसाविषयी एक ट्विट केलं. ‘पत्नी पाऊस थांबण्याची प्रार्थना करतेय जेणेकरुन ती बाहेर जाऊ शकेल. मुलं पाऊस थांबू नये अशी प्रार्थना करत आहेत जेणेकरुन त्यांना शाळेला सुट्टी मिळेल…’, असं ट्विट करत त्याने #MumbaiRains हा हॅशटॅगही वापरला. त्याच्या या ट्विटवर अभिनेता रितेश देशमुखने ‘तू कसली प्रार्थना करत आहेस?’ असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देत शिरिषने आणखी एक ट्विट केलं. ज्यामध्ये तो म्हणाला, ‘कोणाचा देव जास्त कार्यक्षम आहे, याचं मी शांतपणे निरीक्षण करतोय.’
https://twitter.com/ShirishKunder/status/910152373493886977
What are you praying for ? @ShirishKunder https://t.co/3amptND9PD
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 19, 2017
https://twitter.com/ShirishKunder/status/910220059594944513
वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात
पावसाच्या मुद्द्यावरुन कलाकारांमध्ये झालेला हा संवाद पाहता तुमच्या चेहऱ्यावरही हलकसं स्मित आलं असावं. पण, सध्याची परिस्थिती हे स्मित फार काळ टिकू देणार नाही, असंच दिसत आहे. कारण, पावसाचा जोर कमी झाला असला तरीही मुंबईकरांचं ठप्प झालेलं आयुष्य पूर्वपदावर येण्साठी काही वेळ जाणार यात शंकाच नाही. पण, त्यातही पावसाने जोरदार ‘कमबॅक’ केलं तर पुन्हा मुंबापुरीची तुंबापूरी व्हायला वेळ लागणार नाही हेच खरं.