पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेल्या शॉर्ट ड्रेसच्या मुद्द्यावरुन सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरु आहेत. याच चर्चांमध्ये आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यासंबंधीचा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास अप्रत्यक्ष नकार दिला.
बर्लिनमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचे काही फोटोही पोस्ट करण्यात आले. पण, प्रियांकाच्या या फोटोंमध्ये तिच्या ड्रेसवर अनेकांनीच टीका करत नाराजीचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी प्रियांकाने चुकीच्या पद्धतीचा ड्रेस घातल्याचं म्हणत तिला निशाणा करण्यात आलं होतं.
बिग बी अमिताभ यांना ज्यावेळी यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सर्वप्रथम त्यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत, ‘मी काही पंतप्रधान किंवा प्रियांका चोप्रा नाही, त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ?’, अशी कोपरखळी उडवत अप्रत्यक्षरित्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीसोबत म्हणजेच अमृता फडणवीस यांच्यासोबत एका गाण्यातून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच गाण्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, पंतप्रधानांची भेट घेतेवेळी प्रियांकाने शॉर्ट ड्रेस घातला होता. मोदी हे केवळ भारताचे पंतप्रधान नसून ते तिच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर अशा प्रकारे शॉर्ट ड्रेस घालून ती कशी बसू शकते, असा प्रश्न काही नेटिझन्सनी उपस्थित केले. देशाच्या पंतप्रधानांसमोर कसे बसायचे तुला माहिती नाही का? तुला आपल्या कृतीबद्दल खेद वाटत नाही का, असे प्रश्न तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात येत आहेत.
वाचा: प्रियांका चोप्रा कट्टर भारतीय, प्रश्नोत्तरावेळी दिलेली उत्तरं तर पाहा…