हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून ज्या दिवसांच्या आठवणी चित्रपट रसिकांकडून जागवल्या जातात अशाच काळातील एक अभिनेता म्हणजे सुनील दत्त. अभिनय, आवाज आणि सौंदर्याची देणगी लाभलेले सुनील दत्त आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील त्यांचं स्थान आजही अबाधित आहे असंच म्हणावं लागेल. ६ जून १९२९ रोजी जन्मलेल्या दत्त यांची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द फारशी सोपी नव्हती. फाळणीपूर्व भारतातील पंजाब प्रांतात जन्मलेल्या सुनील दत्त यांचं खरं नाव होतं बलराज दत्त.

बलराज दत्त या नावासह ते ज्यावेळी मुंबईत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, बलराज साहनी नावाचा एक फार प्रसिद्ध अभिनेता चित्रपटसृष्टीत गाजतोय. याच्याच आधारे एका इसमाने सुनील दत्त यांना एकसारख्या नावांच्या अभिनेत्यांना चित्रपटसृष्टीत फारसा वाव नाही असं सांगितलं. त्यानंतर बलराज दत्त हे नाव बदलून त्यांनी सुनील दत्त या नावाने नवी ओळख प्रस्थापित केली. नाव बदलल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सुनील दत्त यांना बराच संघर्ष करावा लागला होता.

‘रेल्वे प्लॅटफॉर्म’, ‘कुंदन’, ‘राजधानी’, ‘किस्मत का खेल’ या चित्रपटांतून विविध भूमिका साकारत सुनील शेट्टी यांनी चित्रपटसृष्टीत त्यांचे पाय घट्ट रोवले. त्यामागोमाग आलेला ‘मदर इंडिया’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण देऊन गेला. याच चित्रपटादरम्यान अभिनेत्री नर्गिस यांच्यावर सुनील दत्त भाळले. ‘मदर इंडिया’च्या सेटवर आग लागून एक दुर्घटना घडली होती हे सर्वांनाच ठाऊक आहे. याच दुर्घटनेमुळे बॉलिवूडमध्ये नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली असं म्हटलं जातं.

वाचा: तिचं सोडाच पण तिच्या कुत्र्यालाही मी आवडत नाही- सलमान खान

दरम्यान, सुनील दत्त सुरुवातीच्या काळात ‘रेडिओ सिलोन’मध्येही काम करायचे. त्यावेळी नर्गिस हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारुपास आल्या होत्या. इथे महत्त्वाची बाब म्हणजे सुनील दत्त नर्गिसचे त्या वेळपासूनचे चाहते होते. त्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळी या आघाडीच्या अभिनेत्रीची मुलाखत घ्यायची वेळ त्यांच्यावर आली तेव्हा त्यांच्या तोंडातून चकार शब्दही बाहेर आला नाही. मुलाखतीसाठी बरीच तयारी करुनही नर्गिस समोर येताच सुनील दत्त काहीच बोलू शकले नव्हते. सरतेशेवटी तो मुलाखतीचा कार्यक्रमच रद्द करण्यात आला होता.

सुनील दत्त आणि नर्गिस चित्रपटसृष्टीतील काही आदर्श जोडप्यांपैकी एक होते. ऑनस्क्रीन गाजलेली ही जोडी प्रत्यक्ष जीवनातही फार यशस्वी होती. आजही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये चित्रपट जगतातील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ येते तेव्हा सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या प्रेमकहाणीचा आणि सहजीवनाचा उल्लेख न विसरता केला जातो.