बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आज जयंती. देव आनंद यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली. त्यामुळेच त्यांच्या जयंतीचं निमित्त साधत त्यांनी गाजवलेल्या १० सर्वोत्तम चित्रपटांविषयी जाणून घेऊ.

१. गाईड –

विजय आनंद दिग्दर्शित गाईड हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. या चित्रपटामध्ये देव आनंद हे मुख्य भूमिकेत झळकले होते. यात देव आनंद यांनी राजू गाईड ही भूमिका साकारली होती. तर वहिदा रहेमान यांनी रोझी ही भूमिका वठविली होती. या चित्रपटातील देव आनंद यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सर्वोत्तम अभिनय ठरला. चित्रपटाच्या शेवटी त्याचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे, हा देखील त्यांच्या कारर्किदीतील दुर्मिळ योग.

२. जॉनी मेरा नाम-

गाईड चित्रपटाप्रमानेच जॉनी मेरा नाम या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील विजय आनंद यांनीच केलं. देव आनंग यांचा सर्वोत्तम गुन्हेगारी पट. या चित्रपटात देव आनंद आणि हेमा मालिनी यांची जोडी विशेष लोकप्रिय झाली. तसंच हा चित्रपट प्रेमनाथ, प्राण, पद्मा, रंधावा अशा कितीतरी कलाकारांच्या अभिनयामुळे विशेष चर्चेत राहिला.

३.देस परदेस –

खुद्द देव आनंद यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या वाट्याला नेमके काय येते? हा विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे.

४. वॉरंट –

सत्तरच्या दशकातील तद्दन मसालापट. त्यात पन्नाशीपार देव आनंदचा झीनत अमानला उद्देशून केलेला ‘रुक रुक..रुक झाला हमसे दो बाते करके जाना, यह मौसम हे दिवाना’ हा आग्रह त्यालाच शोभला व देव आनंद यांनी रौप्य महोत्सवी यश संपादन केले. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रमोद चक्रवर्ती यांनी केलं होतं.

५. तेरे घर के सामने

विजय आनंद यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे तेरे घर के सामने. या चित्रपटातही देव आनंद मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे या चित्रपटातील अनेक गाण्यांमध्ये देव आनंद यांचा खास अंदाज पाहायला मिळाला. ‘एक घर बानाऊंगा तेरे घर के सामने’ असो वा ‘दिल का भंवर करे पुकार’ असो. पडद्यावर गाणे कसे सजवायचे हे देव आनंद यांनी दाखवून दिले. अर्थात नूतन यांनीही तितक्याच ताकदीने योगदान दिले आहे.

६. तेरे मेरे सपने –

विजय आनंद यांच्या चित्रपटात देव आनंद आणि मुमताज यांची मस्त जोडी जमल्याचं पाहायला मिळालं. त्यातच सायकलवरचे एक मैने कसम ली आणि जीवन की बगियाँ महकेगी ही गाणी तुफान गाजली.

७. हम दोनो –

अमरजीत यांचा हा चित्रपट. या चित्रपटात देव आनंद दुहेरी भूमिकेत झळकले होते. त्यांच्यासोबत अभिनेत्री साधना व नंदा यांनी स्क्रीन शेअर केली होती. मूळचा हा कृष्णधवल चित्रपट कालांतराने रंगीत स्वरुपात आला. देवने आपण नवीन चित्रपटाच्या तयारीत गुंतलो आहोत हा व्यक्त केलेला आशावाद सतत पुढेच पाहायचे ही त्याची वृत्ती दर्शवणारा होता.

८. हरे राम हरे कृष्ण (दिग्दर्शक देव आनंद)-

देव आनंद यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात झीनत अमानची हिप्पी गर्ल खूपच धाडसी असल्याचं दिसून आलं. तसंच या चित्रपटातील काठमांडूच्या परिसराने विषय प्रवाभी ठरला.

९. ज्वेल थीफ –

देव आनंद यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट. आपण चित्रपटाच्या नायकावर( अर्थात देव आनंद) तोच गुन्हेगार असल्याचा संशय ठेवतो (हे दिग्दर्शकाचे कसब). चित्रपटाचा शेवट धक्कादायक. वैजयंती माला आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत.

१०. फंटूश –

चेतन आनंद यांचा हा चित्रपट. दूखी मन मेरे सून मेरा कहना जहाँ नही चैना वहा नही रहना.. देवची भावूक मुद्रा व्यक्त करणारे हे सर्वकालीन लोकप्रीय गीत. याच चित्रपटात ‘ए मेरी टोपी पलट के आ’ गात सवयीने तो मोकळेपणाने वावरलाही. शैला रामाणी या चित्रपटात नायिका होत्या.

देव आनंद यांची रुपेरी वाटचाल खूपच मोठी आहे. प्रभातच्या हम एक है (१९४६) पासून नवकेतनच्या ‘जाना जा दिलसे दूर’पर्यंत (२०१० हा चित्रपट अप्रकाशित) देव आनंद सतत खुलला, फुलला. चार्जशीट(२०११) हा त्याचा त्यानेच दिग्दर्शित केलेला व प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट.