बॉलिवूडमधील ७० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘शोले’. हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरीच वर्ष झाली. ‘शोले’ हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे ज्याने रुपेरी पडद्यावर १०० दिवस आपली जादू कायम ठेवली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. त्यातीलच जय-वीरु, बसंती,गब्बर यांच्याप्रमाणेच ‘सुरमा भोपाली’ हे पात्रही विशेष गाजलं. इतकंच नाही तर आजही त्यांचे चित्रपटातील विनोदी किस्से आठवून प्रेक्षक खळखळून हसतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते कलाविश्वापासून दूर गेले आहेत. त्यामुळेच आता ते कसे दिसतात, काय करतात याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसून येतं.
चित्रपटामधील गाजलेल्या भूमिकांपैकी एक भूमिका म्हणजे सुरमा भोपाली. ही भूमिका ज्येष्ठ अभिनेता जगदीप यांनी साकारली होती. या चित्रपटानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी आयफा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे त्यांच्यात इतका बदल झाला असून त्यांना ओळखणंही कठीण झालं होतं.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
२९ मार्च १९३९ रोजी जन्मलेले जगदीप आपल्या विनोदी भूमिकांमुळे चांगलेच परिचयाचे बनले आहेत. त्यांनी ‘अंदाज अपना अपना’, ‘पुराना मंदिर’, ‘कुर्बानी’,’शहेनशहा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१२ साली ‘गली गली चोर है’ या चित्रपटात त्यांनी काम केले. परंतु त्यानंतर मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीपासून काढता पाय घेतला. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलांनाही अभिनयाचा वारसा मिळाला आहे. जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हेदेखील कलाविश्वामध्ये कार्यरत आहेत. जावेद जाफरी आपल्या वडिलांप्रमाणे विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो.