नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निहारिका सिंग ही दोन नावे गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहेत. नवाजुद्दीनने दिलेल्या एका कबुलीनंतर सगळीकडेच निहारिका आणि नवाजच्या नात्याची चर्चा सुरु झाली. नवाजुद्दीनच्या आत्मचरित्रातून निहारिका आणि त्याच्या नात्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. पण, त्या पुस्तकात आपल्याविषयी करण्यात आलेले विधान आणि एकंदर आपल्याला ज्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे, यावर निहारिकाने नाराजी व्यक्त केली. नवाजुद्दीन त्याचे पुस्तक विकण्यासाठी, त्याचा खप वाढवण्यासाठी एका महिलेचे शोषण करत आहे, तिचा अपमान करत आहे, असे मत तिने मांडले.
‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत तिने नवाजच्या चरित्रात्मक पुस्तकाविषयी आपले विचार मांडले. मिस लव्हली या चित्रपटाच्या वेळी आपण अवघ्या काही महिन्यांसाठी नवाजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने स्पष्ट केले. आज नवाजुद्दीनने आपल्याला ज्या पद्धतीने सर्वांसमोर सादर केले आहे, ते पाहता मी हसण्याव्यतिरिक्त आणखी काहीच करु शकत नाही असे ती म्हणाली. पुस्तकाची लोकप्रियता आणि त्याचा खप वाढवण्यासाठी नवाज हे सर्व करतो आहे, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली.
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्याविषयीच्या या चर्चा त्याच्या आत्मचरित्रपर पुस्तकातील एका संदर्भामुळे रंगू लागल्या. ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकातून नवाजच्या आयुष्यातील बऱ्याच दुर्लक्षित गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या अनेकांना या गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवणे कठिण जात आहे. या पुस्तकात नवाजने त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीही उघड केल्या आहेत. त्यातच त्याने निहारिकासोबतचे संबंधही सर्वांसमोर आणले. तिच्यासोबत आपले शारीरिक संबंध असल्याचे त्याने या पुस्तकात स्पष्ट केले. त्यामुळेच निहारिकाने पुढे येत नवाजच्या पुस्तकातील त्या संदर्भावर नाराजी व्यक्त केली आहे.