बॉलिवूड कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायांमध्येही बऱ्यापैकी सक्रिय आहेत. हॉटेलिंगपासून ते अगदी ऑनलाइन शॉपिंग ब्रँडपर्यंत प्रत्येक व्यवसायामध्ये ही कलाकार मंडळी तग धरून आहेत. या साऱ्यामध्ये क्लोथिंग ब्रँडच्या व्यवसायात उतरण्याकडे बऱ्याच कलाकारांचा कल दिसतोय. हृतिक रोशन, सोनम कपूर, आलिया भट्ट, कंगना रणौत, अनुष्का शर्मा या कलाकारांनी त्यांच्या क्लोथिंग ब्रँडची सुरुवात केली. त्यातच आता कपूर कुटुंबाचाही समावेश होणार आहे.

अभिनेता रणबीर कपूरच्या बहिणीची मुलगी समारा हिच्या नावाने लवकरच एका क्लोथिंग ब्रँडची सुरुवात करण्यात येणार आहे. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रिद्धीमा कपूरचा पती भरत साहनी या नव्या व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला असून, लहान मुलांसाठीच्या ऑनलाइन क्लोथिंग ब्रँडची तो सुरुवात करणार आहे. ‘समारा’ याच नावाने हा ब्रँड सर्वांच्या भेटीला येणार असून, त्यामुळे रणबीरची भाची प्रकाशझोतात आली आहे. विविध कार्यक्रमांमध्ये रणबीरसोबत समाराचे काही फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत अतसात. पण, तिच्या नावाचा ब्रँड सुरु होणे ही बाब फारच महत्त्वाची आहे. त्यामुळे खुद्द रणबीरही उत्सुक असणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

१ डिसेंबरलाच या ब्रँडची सुरुवात होणार होती. पण, अगदी शेवटच्या क्षणी काही अडचणी आल्यामुळे ठरलेल्या तारखेला त्याची सुरुवात झाली नाहीये. येत्या काही दिवसांमध्ये ‘समारा’ हा ब्रँड सर्वांच्या भेटीला येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तेव्हा आता आपल्या भाचीच्या नावाने सुरु होणाऱ्या या ब्रँडला आता ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची पसंती मिळते का, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.