बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी आणि आपली अशी नवी ओळख प्रस्थापित करण्यासाठी दररोज कित्येक होतकरु कलाकार निर्मिती संस्थांच्या पायऱ्या झिजवतात. त्यातील काहींच्या वाट्याला यश येतं, तर काही मात्र अपयश पचवत पुन्हा नव्या संधीच्या शोधात आपला प्रवास सुरु ठेवतात. काही वर्षांपूर्वी याच होतकरु तरुणांच्या यादीत अभिनेता रणवीर सिंगचाही समावेश होता. सध्याच्या घडीला रणवीर लोकप्रियतेच्या शिखरावर असला तरीही सुरुवातीच्या काळात त्याने जवळपास ३ वर्षे मुंबईमध्ये हातात पोर्टफोलिओ घेऊन कामाच्या शोधात विविध निर्माते आणि दिग्दर्शकांची भेट घेतली होती. खुद्द रणवीरनेच याचा खुलासा ‘न्यूज १८ राइजिंग समिट’मध्ये राजीव मसंद यांच्याशी संवाद साधताना केला. ‘बॅंड बाजा बारात’ या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रणवीरने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. पण, बॉलिवूडमधल्या एका तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्याने हा चित्रपट नाकारल्यामुळेच रणवीरच्या वाट्याला ‘बिट्टू शर्मा’ची भूमिका आली होती.

अनुष्का शर्मासोबत स्क्रीन शेअर करत रणवीरच्या पदार्पणाच्या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. पण, मुळात हा चित्रपट रणवीरला मिळाला तो म्हणजे अभिनेता रणबीर कपूर याच्यामुळे. रणबीरने यशराज बॅनरअंतर्गत साकारलेल्या या चित्रपटातील भूमिकेस नकार दिला आणि मग पुढे या चित्रपटासाठी नवा चेहरा निवडण्याच्या शोधात असणाऱ्या आदित्य चोप्राने रणवीर सिंगची निवड केली. ‘कलाविश्वात मी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीप्रमाणेच होतो. त्यामुळे माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब होती’, असं रणवीर या मुलाखतीदरम्यान म्हणाला.

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

https://www.instagram.com/p/Bf8De4IBa6D/

आदित्य चोप्राने रणवीरला सुरुवातीलाच एक इशारा दिला होता. ज्याविषयीसुद्धा रणवीरने या मुलाखतीत सांगितलं. ‘तू काही फारसा सुंदर दिसत नाहीस, हे मला त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं. जर इथे तुला तग धरायचा असेल आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवायचं असेल तर तुला खरंच खूपच चांगला अभिनय करावा लागणार आहे’, असं आदित्यने रणवीरला सांगितलं होतं. त्याच्या मते, आपण किती विचित्र आहोत हे आदित्यने समंजस शब्दांत सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीच्या चित्रपटापासून ते अगदी भन्साळींच्या बॅनरअंतर्गत साकारणाऱ्या चित्रपटांसाठी पहिली पसंती ठरणाऱ्या रणवीर सिंगने आज या कलाविश्वात मिळवलेलं स्थान पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. पण, सध्याही सुरुवातीच्या दिवसांना तो विसरलेला नाही हेच खरं.