बिग बजेट चित्रपटासाठी महत्त्वाचे सर्व निकष आणि त्यासाठी लागणारी कलाकारांची फळी या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्याची कला भन्साळींना चांगलीच अवगत आहे. याचाच प्रत्यय ‘पद्मावत’ मधून आला. राजपूत संस्कृती आणि एका काल्पनिक कथानकाची साथ घेत साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. दीपिकाने साकारेली राणी पद्मावती, रणवीरने साकारलेला क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जी आणि शाहिदने साकारलेला महारावल रतन सिंह या मुख्य भूमिकांमध्ये बाजी मारली ती म्हणजे रणवीर सिंगने.

रणवीरने अलाउद्दीन खिल्जी इतक्या ताकदीने साकारला की, अनेकांनाच सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या क्रूरतेविषयी तर्क लावणे सोपे झाले. मुळात खिल्जी खरंच इतका क्रूर होता का, हा प्रश्न राहून राहून अनेकांच्या मनात घर करत होता. ‘इंडिया टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आपल्या याच भूमिकेविषयी सांगताना एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता, ‘माझा मेंदू आणि शरीर अगदी पिळवटून निघाले होते. माझ्या स्नायूंमध्ये कोणत्याच संवेदना नव्हत्या. तरीही मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होतो. पण, मुळात मी आतून पूर्ण तुटलो होतो. काही प्रसंगी तुम्ही खंबीर असणे गरजेचेचे असते आणि त्यावेळी मग तुम्ही झपाटल्यासारखे काम करता. मीसुद्धा अगदी तसेच केले. माझ्याकडून शक्य त्या सर्व परिंनी मी स्वत:ला या भूमिकेत झोकून दिले. खिल्जीमध्ये असणारी क्रूरता मी माझ्या अंगी बाणवली होती. अनेकदा तर माझ्या स्वत:च्या दृष्टीने हानिकारक असणाऱ्या गोष्टीही मला कराव्या लागल्या.’

‘पद्मावत’चे कथानक आणि या चित्रपटाच्या चित्रीकरयमाविषयी अधिक माहिती देत रणवीरने काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. चित्रीकरणाच्या वेळापत्रकापासून ते त्याने घेतलेल्या मेहनतीपर्यंत बऱ्याच गोष्टींवरुन एक अद्वितीय कलाकृती साकारण्यासाठी या कलाकारांना किती मेहनत घ्यावी लागते याचाच अंदाज आला. ‘पद्मावतचे चित्रीकरण सलग सुरु होते. दोन तासांच्या मेकअपनंतर पुढील १२ ते १३ तास आम्ही सलग चित्रीकरण करत होतो. या साऱ्यामध्ये मी स्वत:लासुद्धा विसरलो होतो. त्यावेळी काहीतरी चुकीचं घडत असल्याची चाहूल मला लागली होती. सर्व गोष्टींविषयी मी जास्त विचार करत होतो. त्यावेळी मी काही खास मित्रांची आणि माझ्या आईची मदत घेतली. परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून चित्रीकरणानंतर त्यांनी माझ्यासोबत वेळ व्यतीत केला. त्यांच्यामुळेच मी पूर्वपदावर आलो.’

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

विक्षिप्त, महत्त्वाकांक्षी आणि क्रूरतेच्या सीमा ओलांडणारा खिल्जी साकारण्यासाठी रणवीरने सर्वस्व पणाला लावले. पण, यामुळे त्याला वैयक्तीक आयुष्यात मात्र काही अडचणींना तोंड द्यावे लागले. एका भूमिकेला न्याय देण्यासाठी म्हणून रणवीरने प्रचंड मेहनत घेतली खरी, पण त्याच्या चेहऱ्यावर आलेले ते भाव इतक्या सहजासहजी साकारले नव्हते हेच खरे.