बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. चालू घडामोडींवर भाष्य करण्यासाठी ते ट्विटरवर आपली मतं सतत मांडत असतात. अशा या अभिनेत्याची एक मुलाखत सध्या बरीच चर्चेत आली आहे. पाकिस्तानी वाहिनी ‘दुनिया न्यूज’ला Dunya news त्यांनी ही मुलाखत दिली आहे. या वाहिनीवरील ‘ऑन द फ्रंट’ या चॅट शो मध्ये काररान शाहिद यांनी ऋषी कपूर यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी ऋषी कपूर यांचा चित्रपट प्रवास, राज कपूर, पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतचं त्यांचं नातं याविषयांवरही या मुलाखतीतून प्रकाश टाकण्यात आला. त्याशिवाय भारत- पाकिस्तान नातेसंबंधांविषयीसुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आले. जवळपास ३५ मिनिटांच्या या मुलाखतीत ३० मिनिटांनंतर या मुख्य मुद्द्यावर ऋषी कपूर यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

भारत- पाकिस्तान या दोन देशांमध्ये असणारं अशांततेचं वातावरण कुठेतरी कमी व्हावं, त्यासाठी कलेची मदत घ्यावी ही मागणी आजही तशीच आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हा वाद कधी थांबेल का, असा प्रश्न ऋषी कपूर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत ते म्हणाले, ‘मला राजकीय गोष्टी कळत नाहीत. मी एक भावनिक माणूस आहे. माझ्या लेखी भावना जास्त महत्त्वाच्या आहेत. ६५ वर्षांपूर्वी घडून गेलेल्या फाळणीच्या त्याच गोष्टीचा कित्ता आता आणखी किती दिवस गिरवायचा.’ आपलं मत ठामपणे मांडत ऋषी कपूर यांनी या मुलाखतीदरम्यान काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित केले.

‘६५ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या एका गोष्टीची खंत अनेकांच्याच मनात सलत आहे. पण, आता मानवी स्वभावाप्रमाणे ती गोष्टी विसरुन पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात काही गोष्टी विसरणंच जास्त योग्य असतं. फाळणीची तीच गोष्ट सारखी उगाळत बसणं योग्य नाही’, असंही ते म्हणाले.
‘माझ्या वडिलांचा जन्म पेशावर मध्ये झाला होता. फाळणीपूर्व भारतात ते जन्मले होते. पण, त्यानंतर ते पाकिस्तानात गेले नाहीत. १९९० साली मीसुद्धआ फक्त चित्रीकरणाच्या निमित्तानेच पाकिस्तानात आलो होतो पण, आता मीच विचार करतो की, यापुढे मला पाकिस्तानामध्ये जाण्याची संधी मिळेल की नाही?’ असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आणि दोन्ही देशांमध्ये असणारं असामंजस्याचं वातावरण कुठेतरी नाहीसं झालं पाहिजे याकडे सर्वांचं लक्ष वेधलं.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

‘आपण एकच भाषा बोलतो, आपलं खाणं- पिणं एकसारखं आहे. मला दोन्ही देशातील प्रेक्षकांकडून बरंच प्रेम मिळतं पण, मग या देशांमध्ये ही दरी का? जगभरात लोक बदलत आहेत, धार्मिक तेढ नाहीसे होत आहेत. पण, आपल्या इथे तसा प्रयत्नही होत नाहीये’, याचच दु:ख होत असल्याचं ते या मुलाखतीत म्हणाले. या मुलाखतीत पाकिस्तानी प्रेक्षकांनी एक सुरेख भेटही ऋषी कपूर यांना देऊ केली.