भारतामध्ये क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येकाची देशभक्ती, या खेळाप्रती असणारं वेड आणि बऱ्याच भावभावना क्रिकेट सामन्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये क्रीडा प्रेमींच्या भावनांना आणि देशप्रेमाला भलतच उधाण आल्याचं पाहायला मिळतं. अशाच काहीशा वातावरणात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना नुकताच पार पडला. पण, या सामन्यामध्ये भारतीयांची निराशा झाली.

भारत- पाकिस्तान विरोधी या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनीच भारतीय क्रिकेट संघाला निशाणा करत त्यांच्याविषयी बरं-वाईट बोलण्यास सुरुवात केली. त्यातही काही ट्विटर युझर्सनी विशेषत: पाकिस्तान समर्थकांनी भारताविरोधी ट्विट करत आणि आक्षेपार्ह कमेंट करत एका नव्या वादाला तोंड फोडलं. त्यापैकीच एका ट्विटर युझरला (फॉलोअरला) रितेश देशमुखने ब्लॉक केलं आहे.

‘हिंदुस्तान झिंदाबाद’ असं ट्विट करणाऱ्या रितेशच्या ट्विटवर एका पाकिस्तानी समर्थकाने ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ म्हणत निशाणा केलं. त्याचं हे ट्विट पाहून रितेशने थेट शब्दांमध्ये त्याला खडसावत ट्विटरवरुन ब्लॉक केलं. ‘सर मी तुम्हाला ब्लॉक करत आहे. माझ्या देशाविरुद्ध काहीही बोलू नका… तुमचं आयुष्य सुखी जावो’, असं रितेश या ट्विटमध्ये म्हणाला.

r

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देणाऱ्या कलाकारांमध्ये रितेशसोबतच साकिब सलीम, रणवीर सिंग, तापसी पन्नू, शिबानी दांडेकर आणि अशा बऱ्याच सेलिब्रिटींचा समावेश आहे. या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघासोबतच उल्लेनीय कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यालाही पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.