बॉलिवूड कलाकारांच्या दृष्टीने येणारं प्रत्येक वर्ष हे फार खास असतं. विविध चित्रपट, नव्या कल्पना आणि नव्या संधी या साऱ्याची सुरेख घडी बसवत आपल्या चाहत्यांना नेहमीच नवनवीन नजराणे देण्याचा कलाकार मंडळींचा प्रयत्न असतो. यंदाच्या वर्षी अभिनेता सैफ अली खान आणि अक्षय कुमारही असेच काही नजराणे प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. सैफ आणि अक्षय तर विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेतच पण, त्यांची मुलंसुद्धा या कलाविश्वात येण्यासाठी सज्ज झाली आहेत.

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द सैफनेच याविषयीची माहिती दिल्याचे म्हटले जात आहे. सैफने दिलेल्या माहितीनुसार त्याचा मुलगा इब्राहिम आणि अक्षय कुमारचा मुलगा आरव हे दोघंही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहेत. किंबहुना त्यांच्या मित्रांमध्येही अनेकांना ‘बॉलिवूड स्टार’ होण्याची इच्छा आहे. पण, त्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे की नाही याविषयी मात्र साशंकता असल्याचेही सैफने स्पष्ट केले.

बॉलिवूडमध्ये जुन्या गाजलेल्या चित्रपटांच्या रिमेकच्या ट्रेंडची चलती पाहता येत्या काळात अक्षय आणि सैफचा गाजलेला ‘मैं खिलाडी तू अनाडी’, चित्रपटाचा रिमेकही प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची चिन्हं आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने इब्राहिम आणि आरवला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे.

वाचा : ‘टायगर जिंदा है’चा असाही एक विक्रम, आमिरच्या ‘३ इडियट्स’ला टाकले मागे

मुळातच कलेची आवड असणाऱ्या सैफच्या कुटुंबातील जास्तीत जास्त सदस्य अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत, आता सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा या क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचा मुलगा इब्राहिम खानही कला विश्वाची वाट धरेल ही शक्यता नाकारता येत नाही. सैफ आणि अक्षयच्या मुलांचा वावर आणि कलाविश्वात त्यांच्याविषयी होणाऱ्या चर्चा पाहता या दोघांनाही रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader