‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता अभिनेता सलमान खानचा आनंद गगनात मावेनासा झाला असणार यात शंका नाही. या चित्रपटाला मिळालेल्या यशाचे दणक्यात सेलिब्रेशन केल्यानंतर सलमानने त्याचा मोर्चा ‘रेस ३’च्या चित्रीकरणाकडे वळवला. पण, मंगळवारी या चित्रपटाच्या चित्रीकरणात काही अडथळे आल्याचे पाहायला मिळाले. सुत्रांचा हवाला देत ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी ‘रेस ३’च्या सेटवर जाऊन चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांना कल्पना देत चित्रीकरण थांबवण्यास सांगितले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रनगरीमध्ये असणाऱ्या ‘रेस ३’च्या सेटवर पोलिसांनी जाऊन त्यांनी निर्मात्यांना आणि सलमानला सद्यपरिस्थितीची कल्पना देत त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत तातडीने चित्रीकरण थांबवण्यास सांगितले. त्यासोबतच त्यांनी सलमानला लगेचच घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाच्या सुरक्षेत सलमानला त्याच्या कारपर्यंत सोडण्यात आले. पुढे पोलिसांच्या दुसऱ्या तुकडीच्या सुरक्षेत त्याला घरी पोहोचवण्यात आले. सलमानला काही दिवसांसाठी रस्त्यांवर सायकल न चालवण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

काही दिवसांपूर्वीच पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका उद्योगपतीच्या हत्येच्या आरोपाखाली बिष्णोईला जोधपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असताना त्याने सलमानला मारण्याची धमकी दिली होती. ‘सलमानला मी जोधपूरमध्येच संपवणार’, असे तो म्हणाला. या धमकीचा संबंध काळवीट शिकार प्रकरणाशी जोडला जात आहे.

सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. किंबहुना अशा घटना घडत असतानाही तो बऱ्याचदा एकटाच मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना, सायकल चालवताना दिसतो. पण, सद्यस्थितीला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांतर्फे जास्तीत जास्त काळजी घेण्यात येत आहे.