सलमान खानसोबत ‘वीरगती’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री पूजा दडवाल हिच्याविषयीच्या एका वृत्ताने सध्या संपूर्ण कलाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पूजाला क्षयरोग (टीबी) आणि फुफ्फुसांच्या आजाराची लागण झाली असून, या आजाराशी ती लढा देत आहे. तिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे आजारपणासोबतच आणखीही बऱ्याच अडचणींना तिला तोंड द्यावं लागत आहे. आजारपणामुळे तिला कुटुंबियांनीही सोडलं असून, आता तिच्याकडे लक्ष देणारं आपलं असं कोणीच नसल्याचं उघड झालं आहे.
गेल्या १५ दिवसांपासून पूजा शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाली आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने आता मदतीसाठी थेट सलमान खानला साद दिली आहे. माध्यमांच्या मदतीने पूजाने सलमानपर्यंत आपली ही मागणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘६ महिन्यांपूर्वी आपल्याला टीबीची लागण झाल्याचं निदान झालं. तेव्हापासूनच मी मदतीसाठी सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले तर ते माझी मदत करतील अशी आशा आहे, कारण मी गेल्या १५ दिवसांपासून या रुग्णालयात आहे’, असं पूजा म्हणाली.
दरम्यान, चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली पूजा काही काळ गोव्यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. बरीच वर्ष तेथे कसिनोमध्येही तिने काम केलं. पण त्यानंतर मात्र तिला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. साधा चहा पिण्यासाठीसुद्धा आपल्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत असल्याचं पूजाने सांगितलं. तेव्हा आता तिची ही आर्जवी हाक दबंग अभिनेता सलमान खानपर्यंत पोहोचणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकऱ्यांनी पूजाची ही आर्जव सलमानपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
@BeingSalmanKhan veergati's actress pooja dadwal waiting for your financial help pls help her she is admitted in shewri tb hospital Mumbai
— Shariq hasan (@hasan_shariq) March 19, 2018
@BeingSalmanKhan bhai, veergati ki actress Pooja is critical at mumbai’s shivdi hospital, she is suffering frm TB, unable to pay her bills and get proper treatment, help her
— Praveen Chand (@prvvvn) March 19, 2018