बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं आयुष्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला एकाच वेळी किती प्रसंग वाढून ठेवले होते, याची एक वेगळीच कथा. हीच कथा आता एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. राजकुमार हिरामी दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘संजू’ असं असून अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

संजूबाबाच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांवर या चित्रपटातून शक्य त्या सर्व मार्गांनी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याच्या प्रेमप्रकरणांपासून आई- वडिलांसोबत असणाऱ्या समीकरणांपर्यंत सर्वच गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. अशा या चित्रपटात कारागृहाची शिक्षा भोगण्यासाठी गेलेल्या संजूबाबाने कारागृहात कशा प्रकारे दिवस काढले यावरुन आता पडदा उचलला गेला आहे.

२०१३ मध्ये ज्यावेळी संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्यालाही इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जात होती. किंबहुना त्याने कारागृहात कामही केलं होतं. मुळात ही मजुरी असल्यामुळे त्याला त्याबद्दल त्याचा मोबदलाही देण्यात आला होता.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

सोशल मीडिया आणि काही संकेतस्थळांवर उपलब्ध माहितीनुसार कारागृहात संजय दत्त कागदी पिशव्या बनवण्याचं काम करत होता. ज्यासाठी त्याला एका दिवसाचे पन्नास रुपये इतकी मजुरी मिळत होती. इटीच्या वृत्तानुसार २०१६ मध्ये संजूबाबा जेव्हा कारागृहातून बाहेर आला तेव्हा, सेमी स्किल्ड वर्कर म्हणून त्याने जवळपास ३८ हजार रुपयांची कमाई केली होती. असं म्हटलं जातं की, कारागृहाच्या कँटिंनमध्ये त्याने आपले जास्त पैसे खर्च केले. सूत्रांच्या माहितीनुसार कमाईतून उरलेले सर्व पैसे संजयने कारागृहातून बाहेर येताच आपल्या पत्नीच्या म्हणजेच मान्यता दत्तच्या हातात दिले होते.