सलमान खान आणि शाहरुख खान हे दोन्ही अभिनेते अनेकांच्याच आवडीचे आहेत. पण, काही वर्षांपूर्वी या दोन्ही खान अभिनेत्यांमध्ये काही कारणास्तव मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सलमान-शाहरुखच्या या वादाला बरंच खतपाणीही घातलं गेलं. विविध कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यांनाही या दोन्ही कलाकारांची एकत्र हजेरीसुद्धा अनेक चर्चांचा विषय ठरत होती. अनेकांसाठी या दोन्ही कलाकारांच्या नात्यात दुरावा आला असला तरीही दबंग खान आणि शाहरुख यांनी नेहमीच अशा चर्चांचं खंडण केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच भर म्हणजे सलमानच्या आगामी चित्रपटामध्ये असणारा शाहरुखचा कॅमिओ. बॉलिवूडचे हे ‘करण- अर्जुन’ पुन्हा स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामध्ये शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अवघ्या काही सेकंदांसाठी त्याची झलकही पाहायला मिळाली. त्याच्या या कॅमिओबद्दलही सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. खुद्द सलमानही त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बराच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत असलं तरीही शाहरुखने त्याला चांगलच गोत्यात आणलं आहे. ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनच्या निमित्ताने सलमानने नुकतीच एका रेडिओ स्टेशनच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळीच त्याला शाहुखचं एक रेकॉर्डिंग ऐकवण्यात आलं. त्या रेकॉर्डिंगमध्ये शाहरुख काही लहानमुलांना किड्झेनियाला नेण्याविषयी बोलत आहे. मुख्य म्हणजे तो सलमानला तशी विनंती करणार असल्याचं म्हणत आहे. शाहरुखने दिलेला हा धक्का पाहता, ‘अच्छा भला ड्युटी पे लगा रहा है शाहरुख’ असं म्हणत सलमान मिश्किलपणे हसताना दिसत आहे. शाहरुखने कोणतीही कल्पना न देता भाईजान एक प्रकारे बेबीसिटिंगच्या कामासाठी सलमानचं नाव पुढे करत सलमानला अडकवल्याचं पाहायला मिळत आहे.
Aakhir konsi duty par lagaya @iamsrk ne @BeingSalmanKhan ko? @TubelightKiEid @SKFilmsOfficial @kabirkhankk @sonymusicindia @mymalishka pic.twitter.com/f7Af1en7sI
— RedFMIndia (@RedFMIndia) June 15, 2017
मुख्य म्हणजे लहान मुलांनी शाहरुखला सलमान तुमचा भाऊ आहे ना..? असं विचारलं, त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत ‘भावापेक्षाही त्याचं महत्त्व जास्त आहे’, असं उत्तर देत शाहरुखने त्याचं सलमोनसोबतचं नातं सर्वांसमोर मांडलं आहे. दरम्यान, शाहरुखने लहान मुलांना सलमानच्या वतीने दिलेलं किड्झेनिया या थिमपार्कला नेणयाचं वचन आता भाईजान पूर्ण करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.