बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर आहे. गेल्या २५ वर्षांपासून किंग खान प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. पण, हे यश इतक्या सहजासहजी त्याच्या वाट्याला आलेले नाही. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार यांचा आदर्श ठेवून चित्रपटसृष्टीत आलेल्या किंग खानने पाहता पाहता स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. पण, आपल्यासाठी गुरुतुल्य असललेल्या अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मात्र त्याने नाकारली होती.

दिग्दर्शक सुभाष घई युद्धाच्या कथानकावर आधारित एक चित्रपट साकारण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी कलाकारांची निवडही केली होती. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि शाहरुख खान या अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटाचे नावही निश्चित करण्यात आले होते. २००३ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचीही सर्व तयारी करण्यात आली होती. स्क्रिप्टपासून ते चित्रपटातील गाण्यांपर्यंत सर्व गोष्टींची तयारी झाली होती. पण, शेवटच्या क्षणी शाहरुखने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्यास शाहरुखने नेमका नकार का दिला हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून होता. पण, खुद्द सुभाष घई यांनीच याविषयी खुलासा केला आहे. ‘मदरलँड’ या चित्रपटामध्ये बरेच कलाकार असल्याचे कारण देत शाहरुखने तो चित्रपट नाकारला होता. कारण, त्यावेळी तो एकच मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत होता. शाहरुखची ही इच्छा त्यावेळी घई पूर्ण करु शकले नाहीत. कारण, त्यांना मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

शाहरुख खान, दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यासाठीच या चित्रपटाची आखणी करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या राय, प्रीती झिंटा आणि महिमा चौधरी या अभिनेत्रींची नावेही ‘मदरलँड’ चित्रपटासाठी निश्चित करण्यात आली होती. पण, शाहरुखच्या नकारामुळे हा चित्रपट होऊ शकला नाही ही खंत मात्र घई यांच्या मनात तशीच राहिली आहे.