सोशल मीडियावर सध्या अभिनेता शाहरुख खानच्या मृत्युच्या अफवांचा बाजार उठल्याचं पाहायला मिळत आहे. एका युरोपियन वेबसाइने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये किंग खानच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. ब्रेकिंग न्यूज अर्थात ठळक बातम्यांच्या विभागामध्ये किंग खानचा मृत्यू झाल्याचं सांगणण्यात आलं. विमान अपघातात शाहरुखचा मृत्यू झाल्याचं वृत्त पसरल्यामुळे सध्या सर्वत्र गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

बातमीपत्रात म्हटल्यानुसार, शाहरुखच्या विमानाचा अपघात झाला असून त्याच्यासह प्रवास करणाऱ्या इतर सातजणांचाही मृत्यू झाल्याचं म्हटलं जात होतं. हवामानातील बदलामुळे किंग खानच्या विमानाला अपघात झाल्याचं या बातमीतून सांगण्यात आलं. तो आपल्या सहाय्यकासोबत ‘गल्फस्ट्रीम जी ५५०’ या खासगी विमानाने प्रवास करत असून पॅरिसला जात होता, असंही या बातमीत म्हटलं गेलं होतं. इतकच नव्हे तर, शाहरुखच्या मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरल्याचंही म्हटलं गेलं होतं. या बातमीमुळे अनेकांनीच शाहरुखला आणि त्याच्या टीमला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार पोलीस सहाय्यक देवेन भारती यांनी शाहरुखच्या टीमशी संपर्क साधला असून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शाहरुखचा असा कोणताही अपघात झाला नसून सर्वकाही सुरळीत सुरु असून तो सध्या मुंबईतच आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असल्याची माहिती त्याच्या टीमकडून देण्यात आली आहे. शाहरुखच्या मृत्यूसंदर्भत अशा अफवांचा बाजार उठण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी परिस्थितीचं गांभीर्य पाहता मुंबई पोलिसांनीही यात हस्तक्षेप घेत परिस्थिती सावरण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या अफवांपूर्वीच शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर सिलिंग कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं होतं.

वाचा: ‘त्या’च्यावरील प्रेमाने शाहरुख भारावला….

शाहरुख खान किंवा त्याच्या टीमकडून आता या सर्व प्रकारावर काय प्रतिक्रिया दिली जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सेलिब्रिटींच्या मृत्युबाबातच्या अफवा पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मृत्युच्याही अफवा परसल्या होत्या त्यानंतर तिच्या पतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना असं काहीही झालं नसून अफवांमुळे गोंधण्याचं कारण नाही असं स्पष्ट केलं होतं.