गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर एका अडचणीत सापडला आहे. मुख्य म्हणजे या अडचणींमुळे त्याने चक्क स्वत:चे राहते घर बदलून नव्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा सध्या मुंबईतील जुहू येथील प्रणेता अपार्टमेंटमध्ये राहतात. या उच्चभ्रू परिसराची आणखी एक ओळख आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्यांसाठीसुद्धा हा परिसर ओळखला जातो. शाहिदच्या राहत्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जुहू बीच परिसरातील रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि दलाल उभे असतात. याच कारणामुळे त्याने राहते घर बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घराकडे येण्या-जाण्यासाठी शाहिदला हाच रस्ता वापरावा लागतो. पण, रस्त्याच्या आजूबाजूला असणारी ही सर्व परिस्थिती पाहता सध्या त्याला आपल्या कुटुंबासमवेत तेथे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळेच तो या महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचल्याची चर्चा आहे.

वाचा : Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’

‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार २०१४ मध्ये शाहिदने या आपार्टमेंटमध्ये हे घर घेतले होते. त्यावेळी त्याचे मीराशी लग्नही झाले नव्हते. मीराशी विवाहबंधनात अडकल्यानंतरही शाहिद जुहू येथील घरी राहतोय. पण, आता मात्र त्याने हे घर सोडण्याचे ठरवले आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो कुटुंबासमवेत वांद्रे येथील नव्या घरी राहण्यास जाणार असल्याचे कळते. कामाचा वाढता व्याप आणि व्यग्र वेळापत्रक या साऱ्यातून शाहिद त्याच्या कुटुंबाला नेहमीच वेळ देतो. शक्य असेल तितका जास्त वेळ तो मुलीसोबतही व्यतीत करतो. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला काही गोष्टींमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे कळताच त्याने हे महत्त्वाचे पाऊल उचलले.