ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या निधनानंतर त्यांना सर्व क्षेत्रांतून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कलाविश्वात जाण्यांमुळे एक पोकळीच निर्माण झाली असून, ती जागा कधीच भरुन निघणार नाही अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या अभिनेत्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा देत बऱ्याच कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना श्रद्धांजली वाहिली. शशी कपूर यांच्यासोबत ‘दीवार’ चित्रपटात स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर यांनीही शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.
तर, नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शशीजींचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत पृथ्वीराज कपूरसुद्धा दिसत आहेत. फोटोमध्ये बालपणीचे शशी कपूर पाहायला मिळत असून, फार कमी वयातच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाल्याचे लक्षात येत आहे. त्यातच पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतचा हा फोटो ‘शकुंतला’ या नाटकातील असल्याचेही म्हटले जात आहे. या नाटकात शशी कपूर यांनी आपल्या वडिलांसोबत रंगभूमीवर काम केले होते. त्यामुळे या फोटोसोबत बऱ्याच आठवणीही जोडल्या गेल्या असल्याचे कळते.
वाचा : शशी कपूर नसते तर मी सिनेसृष्टीपासून दूर गेलो असतो- अमिताभ
चित्रपटसृष्टीला कोळून प्यायलेला अभिनेता म्हणूनही शशी कपूर यांचा उल्लेख केला जातो. फक्त हिंदीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही शशी कपूर यांच्या नावाभोवती चाहत्यांचे वलय पाहायला मिळाले. अभिनयासोबतच चित्रपट निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. कलाविश्वात दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना बऱ्याच पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. त्यांच्या जाण्यामुळे चित्रपटसृष्टी आणि कपूर कुटुंबातील एका युगाचा अंत झाला आहे असेच म्हणावे लागेल.