श्रीदेवी म्हटले की समोर येतो तो तिचा ‘हवा-हवाई’चा डान्स किंवा मिस्टर इंडियामधले तिचे ‘काँटे नहीं कटते ये दिन रात’ हे गाणे किंवा ‘नगीना’ सिनेमातील तिने साकारलेली इच्छाधारी नागिणीची भूमिका. या सिनेमात श्रीदेवीने डोळ्यातून जे भाव व्यक्त केले आहेत त्याला तोड नाही. सहज सुंदर अभिनय आणि त्यातली निरागसता ही बहुदा श्रीदेवी जन्माला येतानाच घेऊन आली असावी. कारण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने बालकलाकार म्हणूनच काम करायला सुरुवात केली. व्हॉट्स अॅप असेल किंवा इतर सोशल मीडिया श्रीदेवीने लहानपणी भूमिका केलेले अनेक फोटो आपल्या सगळ्यांच्याच पाहण्यात आहेत.
अत्यंत निरागस आणि सोज्ज्वळ भाव तिच्या चेहऱ्यावर आपसूकच आलेले दिसून येते. आज तिने जगाचा निरोप घेतला आहे या बातमीवर विश्वासच बसत नाही. सिनेमा डिजिटल होण्याआधीच्या जमान्यातील अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. ८० ते ९० चे दशक गाजवणारी. खान युगातल्या प्रत्येक नटाला टक्कर देऊन सक्षमपणे आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ती.. अचानक एग्झिट घेऊन निघून गेली आहे, यावर खरोखरच विश्वास बसत नाही.
भूमिका जगणे काय असते ते जर बघायचे असेल तर श्रीदेवीचे सिनेमा पाहून आपल्याला कळते. सोलवा सावन मधून श्रीदेवीने १९७८-७९ च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत पुढची १८-१९ वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य करत राहिली. ‘सदमा’ या सिनेमातली मनोरुग्ण मुलीची भूमिका असेल तिचे ते कुत्र्याच्या पिल्लाला पाहून ‘हरिप्रसाद’ असे ओरडणे असेल. किंवा ‘चाँदनी’ सिनेमातली प्रियकरावर असीम प्रेम करणारी प्रेयसी असेल, ‘नगीना’ सिनेमातली इच्छाधारी नागीण असेल. सगळ्याच भूमिका श्रीदेवीने अजरामर केल्या. चांदनी सिनेमात ऋषी कपूर आणि तिची जोडी होती. तसेच विनोद खन्ना यांचीही या सिनेमात भूमिका होती. प्रेमाचा त्रिकोण सांगणाऱ्या यशराजच्या या सिनेमात श्रीदेवीने आपल्या अभिनयाने तर छाप सोडलीच पण रंगभरे बादलसे गाण्यात पार्श्वगायनही केले. तर ‘चालबाज’ आणि ‘लम्हे’ या सिनेमातल्या तिच्या दुहेरी भूमिकाही गाजल्या.
‘चालबाज’ हा सिनेमा हेमा मालिनी यांच्या सीता और गीता सिनेमाचा रिमेक होता. मात्र तो रिमेक आहे हे विसरायला लावले ते श्रीदेवीने. ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातील ८ मिनिटांचा ‘चार्ली चॅप्लिन’चा प्रसंग पाहताना आपली हसून हसून मुरकुंडी वळते. या प्रसंगाबद्दल असा एक किस्सा सांगितला जातो की जिम कॅरी या हॉलिवूड मधल्या कलाकारालाही श्रीदेवीचा हा अभिनय आवडला होता. आपण असे भाव चेहऱ्यावर कधीही आणू शकत नाही अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली होती. या सिनेमात तिने एका पत्रकाराची भूमिका केली होती. तसेच तिचे ‘काँटे नहीं कटते’ हे गाणेही भलतेच हॉट आणि बोल्ड होते. आजही यू ट्युबवर या गाण्याला लाखो हिट्स मिळत आहेत.
‘खुदा गवाह’ या सिनेमात तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. ८० आणि ९० च्या दशकात माधुरी दीक्षितचे चित्रपटही चांगले यश मिळवत होते. नंबर वन अभिनेत्री कोण? अशा चर्चेला कायम श्रीदेवी असेच उत्तर असे. त्या दोघींनी आपसात कधीही स्पर्धा केली नसावी पण लोक त्यांच्यात तुलना करत. ‘जाग उठा इन्सान’ या सिनेमाच्या सेटवर मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्या अफेअरच्या बातम्या त्यावेळी चांगल्याच रंगल्या होत्या. एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत मिथुन चक्रवर्तीने तर श्रीदेवी आणि त्याचे छुप्या पद्धतीने लग्न झाल्याचेही म्हटले होते. मात्र काही काळानंतर या जोडीची ताटातूट झाली. बोनी कपूर तिच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केले.
‘जुदाई’ सिनेमानंतर तिने काही काळासाठी ब्रेक घेतला. मात्र २०१२ ला ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा पाऊल ठेवले. या सिनेमाची घोषणा करण्यात आली तेव्हाच ‘Queen is back’ असा जल्लोष करत सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. एका व्यावसायिकाची इंग्रजी न येणारी पत्नी श्रीदेवीने ज्या ताकदीने साकारली त्याला जवाब नाही. त्यानंतर आला तो ‘मॉम’ हा सिनेमा. या सिनेमातही श्रीदेवीच मुख्य भूमिकेत होती. मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणारी खंबीर आई श्रीदेवीने साकारली. या दोन्ही सिनेमांना समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही गौरवले. इंग्लिश विंग्लिश या सिनेमासाठी तर श्रीदेवीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते. तिला एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा तिचा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पुढे ९० च्या दशकात मात्र तिने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली. ‘हिम्मतवाला’ या सिनेमात तिने जितेंद्र सोबत काम केले. या सिनेमातले ‘ताथय्या ताथय्या’ गाणेही चांगलेच हिट झाले. आजही त्या गाण्याच्या ओळी लोकांच्या ओठांवर आहेत.
२००८ ते २०१० या काळात तिने लॅक्मे फॅशन वीकमध्येही सहभाग घेतला. रॅम्पवर तिने प्रिया आणि चिंतन यांनी डिझाईन केलेले ड्रेसेस परीधान केले होते. श्रीदेवीला ‘सदमा'(१९८४), ‘चांदनी'(१९९०), ‘खुदा गवाह'(१९९३), ‘गुमराह'(१९९४), ‘लाडला'(१९९५), ‘जुदाई'(१९९८), ‘इंग्लिश विंग्लिश'(२०१३) आणि ‘मॉम'(२०१८) या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच इतरही अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान करण्यात आला. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि सुंदर कारकीर्द असलेली श्रीदेवी यापुढे फक्त आठवणीत असणार आहे. तिच्या गाण्यांतून, सिनेमांतून ती आपल्याला भेटत राहील. सिनेसृष्टीतली ‘चांदणी’ निखळली असली तरीही प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान ध्रुवपदाइतकेच अटळ राहिल यात शंका नाही.
समीर जावळे
sameer.jawale@indianexpress.com