दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या वाटेत येणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नावच घेत नाहीत. सध्या अभिषेकच्या या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमध्ये सुरु असून, चित्रपटाची संपूर्ण टीम त्या ठिकाणी रवाना झाली होती. काही दिवसांपूर्वी चित्रीकरणादरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. पण म्हणतात ना ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, तेच खरं. कारण, ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या टीममध्ये सध्या बरेच वाद सुरु असल्याचं कळतं आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतसुद्धा चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये स्वत:ची मनमर्जी करत असून, त्याच्या या वागण्यामुळे संपूर्ण टीम नाराज असल्याचे म्हटले जात आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलला सुरुवात होणार होती. पण, सर्व तयारी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली असताना सुशांतने चित्रीकरणाच्या तारखांमध्ये अदलाबदल केल्याचे कळते आहे.
वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती
सुशांतच्या अशा वागण्यामुळे ‘केदारनाथ’च्या दिग्दर्शकापुढेही मोठा प्रश्न उभा राहिला. कारकिर्दीत यशाच्या मार्गावर चालताना अशा प्रकारची वर्तणूक आपल्यासाठी घातक ठरु शकते याचा अंदाज बहुदा सुशांतला आला नसावा. कारण त्याच्या या वागण्याचा फटका फक्त ‘केदारनाथ’ चित्रपटाला आणि दिग्दर्शक अभिषेक कपूरलाच बसला आहे असे नाही. तर, ‘रोमियो अकबर वॉल्टर’ या चित्रपटातूनही त्याने काढता पाय घेतला आहे. ज्यामुळे निर्माता बंटी वालियाही पेचात पडल्याचं स्पष्ट होत आहे. सुशांतने चित्रपटातून काढता पाय का घेतला, यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे बंटीने माध्यमांना दिलेल्या माहितीत स्पष्ट केले.