चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख प्रस्थापित करण हे जितकं कठीण असतं त्याहीपेक्षा जास्त कठीण असतं ते या झगमगत्या दुनियेत पदार्पण करणं. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये नव्या जोमाच्या कलाकारांचं अभिनय कौशल्य पाहण्याची संधी मिळतेय. याच कलाकारांच्या गर्दीतील एक नाव म्हणजे अनुष्का शर्मा.
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कोणाचाही वरदहस्त नसताना अनुष्काने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. तिच्या आजवरच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर, अभिनेत्री ते निर्माती असा तिचा आलेख कायमच उंचावत असल्याचं आपल्या लक्षात येत आहे. अनुष्काच्या या वाटचालीमध्ये तिला एका व्यक्तीची मोलाची मदत झाली आहे. ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रीक्स. रॉड्रीक्स यांनीच अनुष्काला हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वांसमोर आणलं होतं. जवळपास सात वर्षांनंतर रॉड्रीक्स आणि अनुष्काची मुंबईच्या विमानतळावर अचानक भेट झाली आणि त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत त्याचा आनंद व्यक्त केला आहे.
वेंडेल रॉड्रीक्सने हा फोटो पोस्ट करत त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘ओखळा पाहू मी कोणाला भेटलो?…’ असं म्हणत सात वर्षांनंतर आपली भेट झाल्याचं त्याने म्हटलं. एका जिन्सच्या दुकानात रॉड्रीक्सने अनुष्काला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यानंतर त्याने तिला फॅशन शो मध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि अनुष्का शर्मा सर्वांसमोर आली. ‘लॅक्मे फॅशन वीक’मधून अनुष्काचा डेहरा सर्वांसमोर आला होता. त्यानंतर तिच्या कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
सध्या अनुष्का अभिनयासोबतच तिच्या ‘क्लिन स्लेट’ या निर्मिती संस्थेवरही लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काळात ती, शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार असून त्यांच्या या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण झालं आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाच्या नावाबद्दल मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.