चित्रपट… प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं एक साधन. पण, या चित्रपटांच्या यादीत काही असे अफलातून चित्रपट येतात जे प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन जातात. अशा काही चित्रपटांमध्ये येणारं एक नाव म्हणजे, ‘जो जिता वही सिकंदर’. आमिर खान, आएशा झुल्का यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने ९० च्या दशकातील प्रत्येकावर एक वेगळीच जादू केली होती. ‘जो जिता…’मध्ये आमिरच्या अभिनयाला अनेकांनीच दाद दिली, पण, आपणही या चित्रपटासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं, असं अभिनेत्री आएशा झुल्काचं मत आहे.
‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आएशाने याविषयीचा खुलासा करत चित्रपटाच्या वेळच्या काही आठवणीही सांगितल्या. ‘जो जिता वही सिकंदर’च्या क्लायमॅक्सच्या वेळचा एक किस्सा तिने यावेळी सांगितला. मन्सूर अली खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये आमिर खान, दीपक तिजोरी, देवेन भोजानी या कलाकारांचा सहभाग होता.
चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या दिवशी स्टेडियममध्ये आएशाच्या डोक्याला दुखापत झाली होती. नखामुळे झालेल्या त्या दुखापतीविषयी सांगताना ती म्हणाली, ‘तेव्हा माझ्या डोक्यातून खूपच रक्त वाहात होतं. किंबहुना चित्रीकरणही थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी सर्वजण धावपळ करत होते. आमिरनेही स्पॉट बॉयला बर्फ आणण्यास सांगितला. त्यानंतर त्याने बर्फाचा खडा माझ्या डोक्यावर ठेवला. त्यावेळी मला माझ्याभोवती झालेली गर्दीच दिसत होती.’
VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
त्या अपघातानंतर आएशाला रुग्णालयात नेऊन तिच्या डोक्यावर टाके घालण्यात आले. साधारण तीन दिवसांसाठी आएशाला आराम करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. त्यावेळी आपल्यामुळे चित्रीकरण लांबल्याचा आएशाला अंदाज होताच. त्यामुळे अशा परिस्थितीतही तिने टोपी घालून चित्रीकरण पूर्ण केले. डोक्यावर असलेले टाके लपवण्यासाठी तिने दिग्दर्शकांकडे विचारणा केली. एकंदरीत आएशाने घेतलेला पुढाकार पाहता तिने चित्रपटासाठी रक्ताचं पाणी केलं असं म्हणण्यास हरकत नाही.