गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत महिलाप्रधान चित्रपटांवर जास्त भर दिला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. मुख्य म्हणजे या कलाविश्वात अभिनेत्यांप्रमाणेच अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडाही लक्षणीयरित्या वाढत आहे. सध्याच्या घडीला मुख्य भूमिकेसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणचे नाव अग्रस्थानी आहे. ओम शांती ओम या चित्रपटापासून सुरु झालेला तिचा प्रवास पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटासाठी दीपिकाला रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्यापेक्षाही जास्त मानधन देण्यात आल्याचे म्हटले जात होते. याविषयी एका कार्यक्रमात दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या ‘थ्री-डी’ ट्रेलर लाँच सोहळ्याच्या नेळी दीपिकाने हजेरी लावली असताना तिला पुन्हा एकदा मानधनाविषयीचेच प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिने या प्रश्नाचे उत्तर देत फक्त काही गोष्टी स्पष्ट केल्या. दीपिकाने तिच्या मानधनाचा आकडा उघड केला नसला तरीही याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तिने सर्वांसमोर मांडला.

‘पीटीआय’ने प्रसिद्ध केलेले्या वृत्तानुसार, मानधनाविषयी दीपिकाला प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देत ती म्हणाली, ‘माझ्या मानधनाविषयी फार काही बोलण्यात मजा नाही. पण, माझ्यामते सध्याच्या घडीला मला मिळत असलेले मानधन पाहता त्याचा मला फार अभिमान आहेच. पण, त्यासोबतच स्वत:वर विश्वासही आहे. तुम्हाला मिळत असलेल्या मोबदल्यात तुम्ही आनंदीतच असता. पण, माझी मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटावर इतका खर्च करण्यात आला, हीच माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असल्याचे तिने म्हटले. किंबहुना याच कारणामुळे मला फार आनंद होतो’, असे दीपिका म्हणाली.

पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’

मानधनाच्या मुद्द्यावरुन आपले विचार ठामपणे मांडत दीपिका पुढे म्हणाली, ‘या चित्रपटावर करण्यात आलेला खर्च, सर्वांची मेहनत पाहता हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे. याआधीही बऱ्याच चित्रपटांतून महिलांची पात्रं तितक्यात प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात आली आहेत. पण, माझ्या मते हा चित्रपट (पद्मावती) महिलांसाठीसुद्धा फार महत्त्वाचा असणार आहे.’

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दीपिकाला १३ कोटी रुपये इतके मानधन मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. मुख्य म्हणजे रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही तितक्याच महत्त्वाच्या भूमिका असूनही त्यांच्या मानधनाचा आकडा फक्त १० कोटी असल्याचेही म्हटले जात होते. तेव्हा दीपिकाला या दोन्ही अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन मिळणार असल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या