बॉलिवूडमध्ये दिवसागणिक ज्याप्रमाणे बऱ्याच चित्रपटांची चर्चा असते त्याचप्रमाणे या कलाविश्वात आकारास येणाऱ्या नात्यांचीही चर्चा अनेकांचं लक्ष वेधते. सध्याच्या घडीला बी- टाऊनमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींचे रिलेशनशिप चर्चेत आहेत. त्यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग Ranveer Singh आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण Deepika Padukone . रणवीर आणि दीपिका यंदाच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याचं या वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं. पण, आता मात्र त्यांच्या लग्नाच्या सनई- चौघड्यांचे सूर थोडे उशीरानेच कानावर पडण्याची चिन्हं आहेत.

‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिकासोबत विवाहबंधनात अडकण्यासाठी रणवीर सज्ज असला तरीही ही ‘मस्तानी’ अभिनेत्री मात्र सध्या त्या मनस्थितीत नसल्याचं कळत आहे. रणवीरसोबतच्या नात्यात दीपिका कमिटमेंट देण्यापासून काहीशी मागे हटताना दिसत असल्याचं कळत आहे.

वाचा : रणबीर- आलियाच्या प्रेमप्रकरणामुळे दुखावली कतरिना?

सर्वकाही सुरळीत सुरु असताना दीपिका नेमकी या मनस्थितीत का आहे, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. यामागचं कारण ठरतंय ते म्हणजे दीपिकाचा भूतकाळ. अभिनेता रणबीर कपूर Ranbir Kapoor आणि दीपिका रिलेशनशिपमध्ये होते ह तर सर्वांनाच ठाऊक आहे. किंबहुना संपूर्ण कलाविश्वात एकेकाळी त्यांच्या प्रेमाचे वारे वाहात होते. पण, कालांतराने त्यांच्या नात्याला तडा गेला आणि या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. ज्यानंतर रणबीर पूर्णपणे या नात्यातून बाहेर पडला. पण, दीपिका मात्र भावनांच्या भरात गेल्यामुळे या साऱ्याच्या तिच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम झाला होता. त्यामुळे आता कोणत्याही नात्यात अडकण्यापूर्वी ती बरीच सावधगिरी बाळगताना दिसतेय.

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

दीपिकाच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘ती रणबीरसोबत भावी आयुष्याचा विचार करत होती. किंबहुना रणबीरसोबत लग्न होऊन आपलं एक कुटुंब असेल याचाही ती विचार करत होती. इतकच नव्हे, तर मिसेस रणबीर कपूर अशी ओळख झाल्यानंतर तिने आपल्या करिअरलाही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि रणबीर त्याच्या आयुष्यात एका वेगळ्याच वाटेवर निघून गेला.’ दीपिकाच्या जवळच्या व्यक्तीने केलेला हा गौप्यस्फोट सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा बी- टाऊनमधील या एक्स कपलच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे.

रणबीरसाठी दीपिकाच्या मनात असणाऱ्या भावनांमुळे सध्याच्या घडीला तिच्या रणवीर सोबतच्या नात्यावर या साऱ्याचा परिणाम होताना दिसत आहे. पण, यावरही ही अभिनेत्री मात करुन आपल्या कामासोबत खासगी आयुष्याची गणितही तितक्याच सहजपणे सोडवेल अशीच सर्वांना आशा आहे.