बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आलेल्या ड्ग्स कनेक्शनचा तपास एनसीबीद्वारे करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी आता अनेक बड्या कलाकारांची नावं समोर येत आहेत. आता बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचंही नाव तपासादरम्यान समोर आलं आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. आज तकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.

जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.

संसदेतही पोहोचला होता ड्रग्जचा मुद्दा

”ड्रग्ज तस्करीची समस्या वाढत आहे. देशाच्या तरूण पिढीला ड्रग्जच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यासाठी षडयंत्र रचले आहे. आपले शेजारील देश यासाठी योगदान देत आहेत. दरवर्षी पाकिस्तान व चीनमधून पंजाब व नेपाळ मार्गे आपल्या देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे.” असं भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार रवि किशन म्हणाले होते.

”चित्रपट जगतातदेखील ड्रग्जचे व्यसन जडत आहे. अनेकजणांना अटक करण्यात आलेली आहे, एनसीबी खरोखर चांगले काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की, याप्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच, आपल्या शेजारील देशांचे कटकारस्थान संपुष्टात आणावे.” असेदेखील ते म्हणाले.