अभिनेत्री कतरिना कैफच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये तिच्या नृत्यकौशल्याची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. ‘शीला की जवानी’, ‘चिकनी चमेली’ या गाण्यांमध्ये थिरकलेल्या कतरिनाने अनेकांनाच घायाळ केलं होतं. अशी ही कॅट आता डान्सिंग सेन्सेशन म्हणूनही ओळखली जातेय. सोशल मीडियावर सक्रिय झालेल्या या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नृत्याचा सराव करतेवेळीचा एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता.

फक्त चित्रपटांतच नव्हे तर विविध पुरस्कार सोहळ्यांमध्येही कतरिनाच्या नृत्याचा जलवा पाहायला मिळाला. ‘धूम ३’ च्या ‘कमली कमली’ या तिच्या गाण्यानंतर तर, अनेकांनीच तिचा उल्लेख ‘कमली’ म्हणून करण्यातही सुरुवात केली. या गाण्यामध्ये नृत्यासोबतच कॅटने काही स्टंट्सही केले होते, त्यामुळे खऱ्या अर्थाने तिने आपल्या नृत्यकौशल्यावर मेहनत केल्याचं पाहायल मिळालं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विविध कार्यक्रमांमध्ये नृत्याविष्कार सादर करणारी कतरिना एका परफॉर्मन्ससाठी ३० ते ४५ लाख रुपयांचं मानधन घेते.

‘चिकनी चमेली’ या गाण्यावर एका कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी तिने चक्क १.५ कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचंही म्हटलं जात होतं. अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीतच या अभिनेत्रीच्या नृत्यकौशल्याने अनेकांनाच घायाळ केलं. अशा या अभिनेत्रीकडून येत्या काळातही काही धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार यात शंकाच नाही.