हिंदी चित्रपटसृष्टीत नावारुपास आल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. अवघ्या काही वर्षांमध्येच ‘क्वांटिको गर्ल’ या नावाने ती ओळखली जाऊ लागली. आपल्यातील वेगळेपण सिद्ध करण्यासाठी काही चित्रपट आणि सीरिजच्या निमित्ताने प्रियांका सध्या जास्तीत जास्त वेळ परदेशातच व्यतीत करते. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती चाहत्यांच्या संपर्कात असेत. सोशल मीडियावरील सक्रियता काही वेळेस तिच्यावर चांगलीच शेकल्याचे पाहायला मिळते. मुख्य म्हणजे याचा प्रत्यय तिला पुन्हा एकदा आला.
मंगळवारी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त प्रियांकाने एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये इंदिरा गांधी यांच्यासोबत प्रियांकाच्या कुटुंबातील काही सदस्य दिसत आहेत. या फोटोमधील आपले कुटुंबिय ओळखता यावेत यासाठी देसी गर्लने एक कॅप्शनही लिहिली. ज्यामध्ये तिने नमूद केले, ‘माझी मावशी, नीला अखौरी, माझी आई आणि आजी-आजोबा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत असतानाचे काही क्षण…’
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
प्रियांकाने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेकांनी लाइक केले. पण, इंदिरा गांधींच्या विचारसरणीचा विरोध करणाऱ्या काही गटातील व्यक्तींनी मात्र तिने पोस्ट केलेल्या या फोटोवर नाराजी व्यक्त केली. एका युजरने तर आपण प्रियांकाला अनफॉलो करत असल्याचेही जाहीर केले. तिने आपल्या नावडत्या व्यक्तीचा फोटो शेअर केल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचेही त्याने या कमेंटमध्ये म्हटले. ‘एक नेता म्हणून इंदिरा गांधी कशाही असल्या तरीही त्यांच्यामुळे हजारो व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. १९८४ मध्ये पंजाबमध्ये त्यांनी आपला राजकीय कावेबाजपणा साधला होता’, असेही एका युजरने लिहिले. हजारो लोकांच्या हत्येसाठी जबाबादार असणाऱ्या व्यक्तीच्या सन्मानार्थ प्रियांकाने ही पोस्ट केल्याचे म्हणत अनेकांनी तिच्यावर नाराजीचा सूर आळवला. तिच्या या पोस्टच्या कमेंटबॉ़क्समध्ये कालांतराने फॉलोअर्समध्येही दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. जेथे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले होते.