दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींच्या शर्यतीत आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर आणखी एका सौंदर्यवतीने आपलं स्थान भक्कम केलं आहे. ती सौंदर्यवती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आपल्या निरागस सौंदर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आलिया ‘राजी’च्या निमित्ताने एका धाडसी भूमिकेत पाहायला मिळाली. सध्या तिच्या याच चित्रपटाची सर्वदूर चर्चा सुरु आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ हा चित्रपट एका असामान्य महिलेल्या आयुष्यावर आधारित असून, बॉक्स ऑफिसवरही याच चित्रपटाची चलती पाहायला मिळते आहे. मेघना गुलजारच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या कलाकृतीला अनेकांनीच डोक्यावर उचलून घेतलं आहे. या साऱ्यामध्ये आलियाचं नाव वारंवार प्रकाशझोतात येत असून, पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत आलियाच्या अभिनय कौशल्यात कशा प्रकारे काही महत्त्वाचे बदल झाले, याविषयीच अनेक चर्चा होत आहेत. ‘राजी’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी तिची प्रशंसा केली जात असून, एका खास व्यक्तीनेही तिच्यासाठी भावनिक संदेश लिहिला आहे.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

आलियाच्या मनाच्या अगदी जवळची ही व्यक्ती म्हणजे तिचे वडील, महेश भट्ट. आपल्या मुलीच्या कारकिर्दीचा उंचावता आलेख पाहून महेश भट्ट यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिच्यासाठी एक भावनिक आणि तितकाच महत्त्वाचा संदेश लिहिला आहे. जो वाचून आलियाने त्यांचे सहृदय आभारही मानले आहेत. ‘आलिया… तू खूपच उंच उंच झेप घेत आहेस… स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचीच सवय अंगी बाणवून घे’, असं ट्विट त्यांनी केलं. आपल्या वडिलांच्या या ट्विटला उत्तर देत आलियाने लिहिलं, ‘बाबा… कितीही पुढे गेले तरीही माझे पाय मात्र जमिनीवर ठेवण्यासाठी मी तुमचे आभार मानते’. कारकिर्दीत कोणत्याही गोष्टीविषयी गर्व न बाळगता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण दिल्याबद्दल आलियाने तिच्या वडिलांचे आभार मानले. सेलिब्रिटी वडील- मुलीच्या जोडीचे हे ट्विट अनेकांचीच मनं जिंकून गेले. फक्त महेश भट्टच नव्हे, तर कलाविश्वात सध्याच्या घडीला बऱ्याच दिग्गजांनी आलियाच्या अभिनय कौशल्याला दाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव घेतलं जाणं वावगं ठरणार नाही.