‘तौबा तुम्हारे ये इशारे…’ हे गाणं सुरु झालं की अनेकांच्या डोळ्यांमोर राणी मुखर्जी उभी राहते. ९० च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी राणी आजही अनेकांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी आहे. सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही अभिनेत्यांसोबत अफलातून ऑनस्क्रीन केमिस्ट्री असणाऱ्या राणीने एक काळ गाजवला होता. निर्माता दिग्दर्शक आदित्य चोप्रा याच्यासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर राणीने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला. ‘मर्दानी’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली खरी. पण, बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांवर मात्र तिची जादू चालू शकली नाही. पण, ते अपयश पचवत आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हिचकी’ या आगामी चित्रपटातून राणी अडखळत आणि तुटक बोलणाऱ्या एक मुलीची व्यक्तिरेखा साकाराणार असल्याचे म्हटले जाते. ही भूमिका तिच्या खऱ्या आयुष्याशीसुद्धा निगडीत असल्याचे म्हटले जाते. कारण राणीने तिच्या खऱ्या आयुष्यात अढखळत बोलण्याच्या समस्येचा जवळपास २२ वर्षे सामना केला आहे. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत राणीने यासंबंधीचा खुलासा केला आहे.

‘मी सुरुवातीपासूनच अडखळण्याच्या सवयीमुळे त्रस्त होते. पण, ही गोष्ट मी कधीच कोणाला जाणवू दिली नाही. किंबहुना एखादे वाक्य बोलताना त्यात कुठे थांबायचे आहे, याची मी जास्तच काळजी घ्यायचे. जेणेकरुन इतरांच्या ही बाब लक्षात येणार नाही’, असे राणीने स्पष्ट केले. त्याचबरोबर वडिलांच्या निधनानंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या राणीला त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी तिच्या मुलीची म्हणजेच आदिराची फार मदत झाली, असेही तिने सांगितले.

वाचा : अनुष्कासाठी तीन महिने शोधत होता अंगठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणी अडखळत बोलायची हा मात्र इतरांसाठी एक धक्काच होता. कारण तिने कधीच ही बाब इतरांच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेतली. याविषयीचाच खुलासा करताना राणी म्हणाली, ‘मी अडखळत बोलते याची माझ्या टीमलाही माहिती नव्हती. कारण या समस्येवर मात करत मी त्यावर उपाय शोधून काढला होता. त्यामुळे कधीही मला कोणत्याच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. किंबहुना आजही चित्रपटातील संवाद बोलताना मी बरीच काळजी घेते.’ अडखळत बोलण्याच्या दोषावर राणीने मात करत आपल्या कारकिर्दीत यश मिळवलेले यश पाहता ही बाब अनेकांसाठीच प्रेरणादायी ठरते आहे.