‘इन आँखों की मस्ती के.. मस्ताने हजारों है’ या ओळी आठवल्यावर रेखा यांचा चेहरा आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर येतो. आपल्या अभिनयाने आणि त्यासोबतच अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री रेखा नेहमीच आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी आहेत. त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही त्या बऱ्याच चर्चेत राहिल्या. पण, रेखा हे कोडं आजही पूर्णपणे उलगडलेलं नाही हेच खरं. त्यांच्या आयुष्यावर पुस्तकही लिहिलं गेलं. पण, आजही त्यांच्या आयुष्यातील काही घटनांवर मात्र अद्यापही पडदाच आहे.

रेखा यांची दैनंदिन जीवनशैलीसुद्धा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. नेहमीच त्यांचा राजेशाही थाट पाहायला मिळतो. सोशल मीडिया आणि काही वेबसाइट्सवर असलेल्या आकड्यांनुसार रेखा ४ कोटी डॉलर्सच्या संपत्तीची मालकीण आहेत. त्याशिवाय वांद्रे बॅण्डस्टॅंड येथे त्यांचा एक आलिशान बंगला आहे. सध्या त्या तिथेच राहतात. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, एक्सयुव्ही या लक्झरी गाड्याही आहेत. आलिशान आणि राजेशाही थाट असणारं जीवन जगणाऱ्या रेखा मोकळ्या वेळात कविता लिहितात. त्यासोबतच योगसाधना करणं, चित्र काढणं यासुद्धा त्यांच्या आवडीनिवडी आहेत.

आज अभिजात सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ज्या रेखाला ओळखलं जातं त्यांच्या वर्णाची आणि वेशभूषेची एकेकाळी खिल्लीही उडवली जायची. पण, वेळ कधी आणि कशी बदलेल याचा काहीच अंदाज नसतो ते म्हणातात ना तसंच काहीसं रेखा यांच्या आयुष्यासोबत घडलं. चित्रपटसृष्टीत त्यांचा चेहरा नावाजला जाऊ लागला आणि रेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागल्या. एकेकाळी कोणीही तिला ओळख देत नसलेली ही अभिनेत्री स्वबळावर आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत पोहोचली. त्यांच्याप्रती लोकांचं प्रेम आणि वेडही अनेकांनी पाहिलं आहे. असंही म्हटलं जातं की, त्या वांद्रे येथील त्यांच्या बंगल्यातून जिममध्ये जाण्यासाठी निघायच्या त्यावेळी त्यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी व्हायची. आजही त्यांच्याप्रती असणारं हे वेड काही कमी झालेलं नाहीये. सध्याच्या घडीला रेखा चित्रपटांमध्ये सक्रिय नसल्या तरीही विविध कार्यक्रमांना त्या न चुकता हजेरी लावतात.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

इतकी दशकं प्रेक्षकांवर आपल्या अदांची जादू करणाऱ्या रेखा यांना आजवर बऱ्याचपुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी आजही बरीत उत्सुकता पाहायला मिळते. विनोह मेहरा, अमिताभ बच्चन यांच्यासोबत या सौंदर्यवतीचं नाव जोडलं गेलं आहे. आजही अमिताभ आणि रेखा एकाच कार्यक्रमात गेले की, सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्याचं पाहायला मिळतं.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

Story img Loader