नवाब कुटुंबाची सून म्हणजेच अभिनेत्री शर्मिला टागोर भोपाळ येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी आग्रही आहेत. त्या घरावर सध्या मालकी असलेल्या आजम खान आणि सैय्यद नवाब रजा यांच्याविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. भोपाळच्या ‘कोह- ए- फिजा’ या भागात असणाऱ्या घरावर सध्या ताबा मिळवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. त्या वडिलोपार्जित संपत्तीवर आपला हक्क असल्याचं शर्मिला यांचं म्हणणं आहे. टागोर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने कोट्यवधींच्या या संपत्तीमध्ये वावरण्याऱ्यांना नोटीस पाठवली आहे.

शर्मिला टागोर यांचे पती आणि क्रिकेटर मन्सूर अली पतौडी हे भोपाळच्या शाही कुटुंबाचे राजकुमार होते. भोपाळचे शेवटचे नवाब हमिदुल्लाह खान यांचे ते नातू होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने हा हक्क सांगण्यात आला आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बैरागडचे तहसीलदार अजय प्रताप सिंग पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच शर्मिला टागोर यांनी ‘दार-उस-सलम’वर दावा ठोकला आहे. त्यांनी लवकरात लवकर आपल्या या संपत्तीवर ताबा मिळण्यासंबंधीचं आवाहन केलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तेथे राहणाऱ्या आजम खान आणि सैय्यद नवाब रजा यांना ते घर खाली करावं लागण्याची चिन्हं आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजम खान आणि सैय्यद नवाब रजा यांनी आपल्या घरावरील ताबा सोडावा असं शर्मिला टागोर यांनी लेखी तक्रारीमध्ये म्हटलं आहे. इतकच नव्हे तर सध्याच्या घडीला आपल्या संपत्तीमध्ये वावर असणाऱ्यांनी काही समाजकंटकांच्या साथीने घराची कुलूपं तोडून काही मौल्यवान वस्तू, महत्त्वाचे लेख आणि लाकडी सामान लंपास केले आहे, असा आरोपही शर्मिला टागोर यांनी त्या दोन व्यक्तींवर लावला आहे.

Story img Loader