अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या करिअरसोबतच कुटुंबालाही प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तीन मुलांच्या मातृत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सनीने एका मुलाखतीत तिच्या पालकत्वाच्या अनुभवाविषयी काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

सनीने सर्वप्रथम एक मुलगी दत्तक घेत निशा असं तिचं नाव ठेवलं. निशाच्या येण्याने सनीच्या कुटुंबाचा त्रिकोण खऱ्या अर्थाने पूर्ण झाला. त्यानंतरच काही महिन्यांनी तिने सरोगसीच्या मार्गाचा अवलंब करत अशर सिंग वेबर आणि नोहा सिंग वेबर याचं पालकत्वं स्वीकारलं. सध्या सनी तीन मुलांचा सांभाळ करत असून आपली जबाबदारी पार पाडत आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार याविषयीच अधिक माहिती देत सनी म्हणाली, ‘बऱ्याच वर्षांपासून आम्ही या गोष्टीविषयी विचार करत होतो. मुख्य म्हणजे एकाच दिवशी आम्ही या तीन मुलांचा विचार केला होता. त्यानंतर २१ जूनला आम्हाला निशाच्या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेविषयीचं पत्रक मिळालं. योगायोगाने हा तोच दिवस होता जेव्हा आम्ही आयवीएफ टान्सफर करुन घेतलं होतं. या सर्व गोष्टी जणू एकमेकांशी एखाद्या दैवी योजनेप्रमाणे जोडल्या गेल्या होत्या. जणू काही देवाने खास आमच्यासाठीच ही आखणी केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासूनचा हा प्रवास खुपच सुरेख होता. आम्ही आता तीन मुलांचे पालक आहोत.’

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

मुलांच्या येण्याने आपलं कुटुंब पूर्ण झालं आहे, आपल्या आयुष्याची कहाणीच बदलली आहे. मुख्य म्हणजे या एकाच गोष्टीची आम्ही फार प्रतिक्षा केली होती, असं म्हणत हे आमच्या (डॅनिअल आणि सनीच्या) आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे क्षण असल्याचंही तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. निशाही तिच्या जुळ्या भावंडांसोबत छान रुळली असून, एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणेच त्यांची काळजी घेतेय, असंही तिने सांगितलं. आपल्या मातृत्वाविषयी सांगताना पती डॅनिअलचीही आपल्याला साथ लाभत असून, तोसुद्धा त्याची जबाबदारी अगदी सुरेखपणे पार पाडतोय, असं मोठ्या अभिमानाने सांगितलं.