चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून स्वराने साकारलेल्या भूमिकेविषयी सध्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत. कोणी तिच्या अभिनयाची दाद देत आहे, तर कोणी तिच्यावर टीकेची झोड उठवत आहे. चित्रपटात असणाऱ्या हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे स्वरावर काही प्रेक्षकांनी उघडपणे टीका केल्याचं पाहयला मिळालं.

चित्रपटात तिने साकारलेलं हस्तमैथुनाचं दृश्य हे पूर्णपणे आक्षेपार्ह आणि लज्जास्पद असल्याचं म्हणत अनेकांनी आपली मतं मांडली. या साऱ्यावर आता स्वराच्या आईने म्हणजेच इरा भास्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्वराच्याच दृश्यावर नव्हे, तर एकंदरच हस्तमैथुन आणि सेक्सविषयीच्या दृश्यांना रुपेरी पडद्यावर कशा प्रकारे साकारण्यात येतं याविषयी आपलं मत मांडलं. चित्रपट इतिहास क्षेत्रातील पीएचडीचे शिक्षण घेतलेल्या इरा यांनी या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मांडला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडलं.
गेल्या काही दशकांपासून सेक्स, महिला आणि त्याविषयीचं आकर्षण, त्यातून महिलांना मिळणारा आनंद या गोष्टी चित्रपटांतून नेमक्या कशा प्रकारे मांडण्यात आल्या याविषयी स्वराच्या आईला प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत त्या म्हणाल्या, ‘सेक्स हा एक असा विषय आहे जो भारतीय चित्रपटांमधून उघडपणे व्यक्त होऊ शकलेला नाही. त्याचवेळी आपल्या चित्रपटांमध्ये एक वेगळी शैली नावारुपास आली. अतिशय सोप्या अशा या शैलीतून लैंगितकेविषयीच्या आकर्षणावर भाष्य करण्यात आलं. ती शैली म्हणजे चित्रपट गीतं.’

वाचा : Veere Di Wedding : …म्हणून स्वरा भास्कर होतेय ट्रोल, सोनमने केला खुलासा

आपल्या या वक्तव्याला आणखी सोप्या शब्दांत समजावून सांगत त्या म्हणाल्या, ‘काही गोष्टी थेट व्यक्त न करता त्या गाण्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. मग ते हिंदी गाणं असो, बंगाली गाणं असो, मल्याळी किंवा तामिळ गाणं असो. तुम्हाला ही गोष्ट आणखी कुठेही आढळणार नाही. गाण्यांच्या माध्यमातून शब्दांतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या जातात. भावनिक गोष्टीसुद्धा. पण, बऱ्याचदा या शब्दांतून व्यक्त होण्याविषयीसुद्धा काही पूर्वग्रह पाहायला मिळतात. लैंगिकता आणि काम वासनेचं उदाहरण घ्या ना. याविषयीची काही उदाहरणं देत इरा भास्कर पुढे म्हणाल्या, ”मुघल- ए- आझम चित्रपटातील ‘जोगन बन चली’ या गाण्याचच उदाहरण घ्या ना. ‘जोगन’ या शब्दाचा अर्थ आहे ‘मीरा’. जिने स्वत:च्या प्रेमासाठी साऱ्या जगाचा त्याग केला होता. एखाद्या गोष्चीप्रती असलेली तीव्र ओढच त्यातून पूर्ण झाली होती. मग ही ही एक प्रकारची महिलेची तीव्र इच्छाच नाही का झाली? या चित्रपटांमध्ये लैंगिकतेशी निगडीत किंवा प्रेमात आकंठ बुडालेल्या युगुलांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती थेट दाखवण्यात यायच्या नाहीत. किंबहुना महेश भट्ट यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत काम वासनेवर भाष्य करणारं सर्वाधिक उत्तम दृश्य म्हणून दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यातील त्या क्लोज अप दृश्याचं उदाहरण दिलं होतं.”

वाचा : रणबीर- आलियाच्या प्रेमप्रकरणामुळे दुखावली कतरिना?

‘फायर’, ‘लिपस्टीक अंडर माय बुरखा’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांची उदाहरणं देत महिलांच्या इच्छाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत हा मुद्दाच अधोरेखित केला गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याशिवाय अशा दृश्यांना सर्व स्तरांतून स्वीकृती मिळण्यासाठी वेळ द्यावा लागेल, असंही त्या म्हणाल्या.