बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या निवासस्थानावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला असून कारवाई केली जात आहे. दरम्यान काही भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा प्रियकर मॅथियस बोई याने केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केलं असून घरामध्ये उगाच तणाव निर्माण झालं असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या ट्विटला किरेन रिजिज यांनी उत्तर दिलं असून आपल्या कर्तव्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे.

आयकर विभागाने दोन चित्रपट कंपन्या, दोन गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि आघाडीच्या अभिनेत्रीच्या निवासस्थानावर छापे टाकून ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा गुरुवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला. मात्र मंडळाकडून कोणाचंही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस

दरम्यान तापसीच्या प्रियकराने किरेन रिजिजू यांना ट्विट करत म्हटलं आहे की, “मी थोडा गोंधळलो आहेत. पहिल्यांदाच काही महत्वाच्या खेळाडूंचा प्रशिक्षक म्हणून भारताचं नेतृत्व करत आहे. यादरम्यान तापसीच्या घरावर आयकराने धाड टाकत आहे, यामुळे कुटुंबाला आणि खासकरुन तिच्या आई-वडिलांना विनाकारण त्रास होत आहे. किरेन रिजिजू कृपया काहीतरी करा”.

मॅथियसच्या या ट्विटला किरेन रिजिजू यांनी उत्तर दिलं असून म्हटलं आहे की, “कायदा सर्वोच्च असून, त्याच्याशी बांधील राहिलं पाहिजे. हा विषय आपल्या हातात नाही. पण आपल्या व्यवसायिक कर्तव्याशी बांधील राहिलं पाहिजे आणि भारतीय खेळासाठी जे सर्वोत्तम आहे ते केलं पाहिजे”.

आयकर विभागाकडून बुधवारी तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्यांचे भागीदार यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. सेलिब्रिटींचे काम करणारे काही अधिकारी आणि केडब्ल्यूएएन आणि एक्सिड या गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आत्ताच वाद का? २०१३ मध्ये पण असे घडले होते; सीतारामन यांचे स्पष्टीकरण

चित्रपट, वेब मालिका, अभिनय आणि दिग्दर्शन आणि गुणवत्ता व्यवस्थापन आणि अन्य कलाकारांशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकण्यात आल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कोणाचाही नामोल्लेख न करता सांगितलं. तथापि, तापसी पन्नू, फॅण्टम फिल्म्सचे चार माजी प्रवर्तक कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधु मन्तेना यांच्यावर छापे टाकण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.