हार्वी विनस्टीन प्रकरण गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर, बऱ्याच कलाकार मंडळींनी विशेषत: अभिनेत्रींनी या विषयावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनाही सर्वांसमोर उघड केल्या. याविषयीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री विद्या बालनने तिचे मत मांडले. महिलांना त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी उघडपणे बोलताना बऱ्याचदा संकोचलेपणा वाटतो, असे विद्या या मुलाखतीत म्हणाली.

मुलाखतीत तिने तिच्यासोबत घडलेला एका प्रसंगही सांगितला. ‘लहान असताना मी एकदा इमारतीच्या परिसरात फुलं तोडत होते. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका अनोळखी इसमाने माझ्या मांडीच्या आतल्या भागात चिमटा काढला होता. मी लगेचच माझ्या आईवडिलांना याविषयी सांगितले आणि त्यांनी त्या व्यक्तीला पकडण्यासाठी धाव घेतली. पण, तोपर्यंत त्याने पळ काढला होता. त्या क्षणापासून, ‘अशा’ विषयांवर मी आईवडिलांशी मोकळेपणाने बोलू लागले. महिलांच्या मतांनाही पुरुषांइतकेच प्राधान्य दिले जाणाऱ्या एका कुटुंबातून आल्यामुळे मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते’, असे विद्याने या मुलाखतीत सांगितले.

प्रत्येक महिला तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी खुलेपणाने बोलेलच असे नाही, हा मुद्दा पटवून देत विद्या म्हणाली, ‘चित्रपटासाठी २ कोटींचे मानधन घेणाऱ्या एखाद्या अभिनेत्रीनेही या साऱ्याचा सामना केला असून, तिनेसुद्धा यावर मौन राखले असेल. जर त्या अभिनेत्रीला याविषयी उघडपणे बोलण्यास संकोलचेपणा वाटत असेल, तर एखाद्या सर्वमासामान्य महिलेलाही तिच्यासोबत झालेल्या अशा प्रसंगाविषयी बोलण्यास अवघडल्यासारखे वाटतच असणार.’

वाचा : बिल गेट्सनाही भावला ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’

अचानक चर्चेत आलेल्या हार्वी विनस्टीन प्रकरणानंतर फक्त परदेशातच नव्हे तर, भारतातही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. याविषयीच काही गोष्टी स्पष्ट करत ती म्हणाली, ‘नेमकं आताच या सर्व प्रकरणाला वाचा का फुटली असा प्रश्नच कसा पडू शकतो. एखादी महिला तिच्यासोबत घडलेल्या कोणत्याही चुकीच्या प्रसंगाविषयी इतका काळ मौन पाळून होती, याचा अर्थ तिला या साऱ्याविषयी खुलेपणाने बोलणे कठीण जात होते. तुम्ही कशा प्रकारचे कपडे घालता आणि काय काम करता याचा इथे काहीच संबंध नाही. पण, दुष्कृत्य करणाऱ्यावर योग्य ती कारवाई होऊन त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे.’