टेलिव्हिजनची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयातच एकताने मालिका आणि सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होते. आजवर अनेक मालिकांची निर्मिती करत एकताने टेलिव्हजन क्षेत्रात तिचं वर्चस्व निर्माण केलंय. मालिकाच नाही तर सिनेमा आणि वेब सीरिजच्या निर्मितीतूनही तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. एकता कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
एकता कपूर ही दिग्गज अभिनेते जितेंद्र यांची मुलगी असून एकताचा जन्म ७ जून १९७५ला झाला होता. एकता ४६ वर्षांची झाली असून ती अजूनही सिंगल आहे. एकताला रवि हा मुलगा आहे. सरोगसीच्या मदतीने २७ जानेवारी २०१९ला रविचा जन्म झाला. एकता सिंगल मदर असून मुलाचा सांभाळ करतेय. आपल्या मुलासोबतचे अनेक फोटो एकता सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
अवघ्या १५व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात
अवघ्या १५ वर्षांची असतानाच एकता कपूरने सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं. कमी वयातच एकताला निर्मिती क्षेत्रात काम करण्याची रुची निर्माण झाली होती. यासाठी तिला वडील जितेंद्र यांनी साथ दिली. १९९५ साली एकताने ‘हम पांच’ , ‘पड़ोसन’, ‘कॅप्टन हाउस’ आणि ‘मानो या न मानो’ या मालिकांची निर्मिती केली होती. यानंतर एकताने कन्यादान, घर एक मंदिर, क्योंकि सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कुसुम, कसौटी जिंदगी की, पवित्र रिश्ता, बड़े अच्छे लगते हैं अशा अनेक सुपरहीट मालिकांची निर्मिती केली. एकता कपूरच्या मालिकांना चाहत्यांची कायम पसंती मिळाली.
यानंतर एकताने डिजिटल विश्वातही तिची जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. अल्ट बालाजी या प्रॉडक्शन कंपनीच्या बॅनरखाली एकता अनेक वेब सीरिज आणि सिनेमांची निर्मिती केली. या वेब सीरीज आणि सिनेमांनी ओटीटीवर धुमाकुळ घातला.
View this post on Instagram
‘या’ गोष्टींना एकता प्रचंड घाबरते
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपला जम बसवणारी एकता कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. तसचं एकता अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात विश्वास ठेवते. मालिका किंवा सिनेमाचं नाव ठेवताना ती या गोष्टींना ध्यानात ठेवूनच नाव ठरवते. एवढी मोठी प्रसिद्धी मिळवलेली एकता कपूर काही गोष्टींना मात्र प्रचंड घाबरते. एकताला अंधार आणि उंच ठिकाणांची भीती वाटते.
बोल्ड विषयांवरील वेब सीरीज आणि वेब सिनेमा यामुळेदेखील एकता कपूर अनेकदा चर्चेत आली आहे.