‘पहली नजर, पहला प्यार..’ वगैरे वगैरे हे सर्वकाही चित्रपटांमध्ये ऐकण्यापुरताच चांगलं वाटतं अशी धारणा असणारा एक वर्गही समाजात वावरतोय. किंबहुना कलाविश्वातही असे काही कलाकार आहेत ज्यांच्या खासगी आयुष्यात पहिल्या वहिल्या गोष्टींपेक्षा दुसरी संधी दिलेल्या गोष्टी जास्त यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळालं. समाजामध्ये असंच अनन्य साधारण महत्त्व असणारी गोष्ट म्हणजे विवाहसंस्कृती. लग्न, नातं, आणि त्यामध्ये असणाऱ्या मर्यादा या सर्व गोष्टींना कितीही मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात पारंपारिक समजुतींची झाक असतेच. पण, याच समजुती मोडीत काढत काही सेलिब्रिटींनी घटस्फोटित महिलांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कलाविश्वात कोणत्याही प्रसिद्ध चेहऱ्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांनाच कुतूहल लागून राहिलेलं असतं. त्यातच कलाकारांचे ब्रेकअप, पॅचअप, एकमेकांसोबत त्यांची जोडली जाणारी नावं या गोष्टींविषयी बऱ्याच चर्चाही रंगतात. किंबहुना समाजात काही महत्त्वाच्या रुढी रुजू करण्यासाठी हे कलाकारच कारणीभूत असतात असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग अशी कलाकार मंडळी आहेत तरी कोण यांच्यावर एक नजर टाकुया.
संजय दत्तसोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी मान्यता, मिरज उल रेहमान नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबंधनात अडकली होती. पण, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सध्या मान्यता आणि संजयची जोडी बॉलिवूडमधील अनेकांच्याच आवडीची जोडी ठरत आहेत.
बक्तीयार इरानीने सुद्धा अभिनेत्री तनाज इरानीसोबत लग्न केलं. पण, बक्तीयारसोबत लग्न करण्यापूर्वी तिने प्रसिद्ध छायाचित्रकार फरीद करीमसोबत लग्न केलं होतं.
अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेत्री योगिता बालीसोबत संसार थाटला. मिथुन चक्रवर्तींसोबत लग्न करण्यापूर्वी योगिता बाली गायक किशोर कुमार यांच्या पत्नी होत्या.
टेलिव्हिजन विश्वातील अनेकांच्या आवडीची जोडी म्हणजे राम कपूर आणि गौतमी गाडगीळ. राम कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी गौतमी एका अपयशी लग्नातून सावरली होती.
अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणारा गायक अरिजित सिंग विवाहित आहे यावर अनेकांचा विश्वासही बसत नसला तरीही हे खरंय. कोएल रॉयसोबत विवाहबंधनात अडकलेल्या अरिजितचे फोटो पाहून अनेकांनाच धक्का बसला होता. अरिजितच्या पत्नीचं याआधी एक लग्न झालं होतं.
कलाविश्वामधील आणखी एक बहुचर्चित जोडी म्हणजे गायिका आशा भोसले आणि संगीत दिग्दर्शक, गायक आर. डी. बर्मन. ही जोडी आजही अनेकांच्या आवडीची आहे.
मयांक आनंदने टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न करुन आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. श्रद्धा आणि मयांक दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. त्याच्यासोबत विवाहबद्ध होण्याआधी श्रद्धाने अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं होतं.
अनुपम खेर आणि किरण खेर हे चित्रपटसृष्टीतील सिनियर कपल आहेत. गौतम बेरी हे किरण खेर यांचे पहिले पती होते.
आपल्या लेखणीतून अजरामर कलाकृती सर्वांसमोर सादर करणाऱ्या गुलजार यांच्याशी राखी यांनी दुसरं लग्न केलं. आता राखी आणि गुलजार, दोघंही वेगळे झाले असले तरीही त्यांचा घटस्फोट झाला नाहीये.
चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा नीलम कोठारीने अभिनेता समीर सोनीसोबत दुसरं लग्न केलं.
टेलिव्हिजन अभिनेत्री लता सब्रवाल आणि संजीव सेठ यांच्या लग्नाच्या बातमीनेही अनेकांचं लक्ष वेधलं होतं. हे या दोघांचंही दुसरं लग्न होतं.