एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ हा सिनेमा तिकीटबारीवर अक्षरशः धुमाकुळ घालतो आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी संपूर्ण देश या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून नवा इतिहास रचला आहे. ‘बाहुबली’ने आमिरच्या ‘दंगल’ आणि सलमानच्या ‘सुलतान’ सिनेमालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले. मुळ ‘बाहुबली’ सिनेमा हा तेलगू भाषेत बनवला गेला असून इतर भाषांमध्ये तो डब केला आहे. पण सिनेमाला भाषेची गरज नाही म्हणतात त्यानुसार, इतर भाषांमध्येही फक्त बाहुबली सिनेमाचीच चर्चा पाहायला मिळते आहे. आता ‘बाहुबली’सारखा एखादा सिनेमा बॉलिवूडमध्येही बनवावा अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. पण ‘बाहुबली’सारखा सिनेमा बॉलिवूडमध्ये का बनू शकत नाहीत याची पाच कारणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यावरून बाहुबलीसारखा सिनेमा बॉलिवूडमध्ये बनणं का शक्य नाही याचं उत्तर तुम्हाला मिळेल.

बॉलिवूड ४३० कोटी रुपये खर्च करू शकत नाही-
‘बाहुबली- द बिगिनिंग’ हा सिनेमा १८० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता. तर ‘बाहुबली २’ हा सिनेमा बनवायला चक्क २५० कोटी रुपये लागले होते. बॉलिवूडचे बिग बजेट प्रोजेक्ट पाहिले तरीही ते या सिनेमाच्या बजेटच्या आसपासही नाहीत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे सिनेमे हे भव्य असतात. त्यांनी बनवलेला ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमाही १२५ कोटी रुपयांचा होता. आतापर्यंत बॉलिवूडमधला सर्वात महागडा सिनेमा म्हणून ‘प्रेम रतन धन पायो’कडे पाहिले जाते. हा सिनेमा १८० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता.

कोणताही अभिनेता एका सिनेमासाठी पाच वर्षे देणार नाही-
प्रभासने ‘बाहुबली’ सिनेमासाठी पाच वर्षे दिली होती. या पाच वर्षांत त्याने दुसरा कोणताही सिनेमा स्वीकारला नव्हता. तर बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेता हा वर्षाला एकाहून जास्त सिनेमात दिसतो. तसेच दाक्षिणात्य सिनेमांसाठी तिकडचा प्रेक्षक अक्षरशः वेडा असतो. तसं वेडेपण हिंदी सिनेमांमध्ये दिसत नाही. त्यामुळे तिथले कलाकारही प्रत्येक कामात स्वतःला झोकून देतात.

बॉलिवूड सिनेमाच्या केंद्रस्थानी स्त्री पात्रांना फार महत्त्व नसते-
बॉलिवूडमध्ये जरी ‘क्वीन’, ‘कहानी’, ‘डिअर जिंदगी’ यांसारखे स्त्रीप्रधान सिनेमे आले असले तरी त्यात ‘बाहुबली’ सिनेमामध्ये जशी स्त्री पात्र मजबूत दाखवण्यात आली आहेत त्यापद्धतीने बॉलिवूडमध्ये स्त्री पात्र दाखवण्यात येत नाहीत.

सहाय्यक कलाकाराला मिळतो कमी वेळ-
‘बाहुबली’चे दोनही भाग बघताना तुमच्या हे लक्षात आलंय का की कटप्पाची व्यक्तिरेखा सिनेमाच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत दिसते. खरी कथा ही बाहुबली आणि भल्लाल देव यांच्यातली असली तरी कटप्पाही या कथेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पण हा सिनेमा राजमाता शिवगामी देवीशिवायही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ‘बाहुबली’ सिनेमात मूळ कलाकारांप्रमाणेच सहाय्यक कलाकारांनाही तेवढंच महत्त्व देण्यात आलं आहे. तसं बॉलिवूडच्या कोणत्याच सिनेमात दिसत नाही.

बॉलिवूड मार्केटिंगमध्येही मागेच-
‘बाहुबली’ सिनेमाची निर्मिती मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून केली गेली असली तरी ज्या पद्धतीने या सिनेमाचे मार्केटिंग करण्यात आले यावरुन त्यांनी मार्केटिंगचा नवा पायंडा पाडला आहे. ‘बाहुबली २’ सिनेमाच्या मार्केटिंगची प्रशंसा करु तेवढी कमीच आहे. बाहुबली सिनेमाने कशा प्रकारे सिनेमाची मार्केटिंग केली यावर अनेक बिझनेस कॉलेज अभ्यास करू शकतात.