मागील दोन दिवसांपासून गाजत असलेल्या भीमा- कोरेगाव हिंसा प्रकरणानंतर दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे राज्यभर पडसाद पहायला मिळाले.. मुंबई- ठाण्यासहीत राज्यातील अनेक भागांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले दिसले. हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी या आंदोलनामुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागले. या आंदोलनाची झळ बॉलिवूडलाही पोहोचली. आधीच ठरलेले नियोजन डरमळल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त केली.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि गायकांनी महाराष्ट्र बंदचा विरोध केला. राहुल ढोलकिया, अनुभव सिन्हा, पुलकित सम्राट आणि विशाल दादलानीसह अनेक कलाकारांनी ट्विटरवर त्यांचे विचार मांडले. ‘सोनी के टीटू की स्विटी’ आणि संजय सूरीच्या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

महाराष्ट्र बंदचा विरोध करताना अशोक पंडित म्हणाले की, ‘हिंसेला घाबरून लोक कामावर गेले नाहीत. कामगारांच्या अनुपस्थितीमुळे फिल्मसिटी आणि दुसऱ्या ठिकाणी सिनेमे आणि मालिकांचे चित्रीकरण बंद पडले… हे फार दुःखद आहे.’

अनुभव सिन्हानेही या घटनेची निंदा करत म्हटले की, ‘आज महाराष्ट्रात काय घडलं हे मी लहान मुलांना कसं समजावून सांगू हेच कळत नाहीये. लहान मुलांना जाणून घ्यायची इच्छा आहे.. पण त्यांना समजावण्यासाठी मला काय बोलायला हवे…’

अभिनेता पुलकित सम्राटनेही ट्विट करत म्हटले की, ‘लोकांनी आता जातीची लढाई सुरू केली आहे. अशा लढाई करण्यासाठी आपण नेहमीच कारणं शोधत असतो.’

संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीने लिहिले की, ‘लोकांमध्ये जाती- धर्मावरुन वाद व्हावा हे सर्वात निंदनीय आहे. जी लोक अशा बुरसटलेल्या विचारांना मानवतेशी जोडतात अशा लोकांनाच त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखांचा सामना करावा लागतो.’