करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन केलं आहे. त्यासोबतच शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे आणि मॉल ही ठिकाणं काही दिवस बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. यामध्ये चित्रपट, मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींचे चित्रीकरण १९ ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,  या काळात चित्रीकरण पूर्णपणे बंद जरी असलं तरीदेखील या दिवसांमधील वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. ‘प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने मंगळवारी घोषणा करत ही माहिती दिली.

करोना विषाणूमुळे अनेक क्षेत्रातील कामकाज बंद करण्यात आले आहेत. यामध्ये कलाविश्वाचादेखील समावेश आहे. परंतु या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करता ‘प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एका मदतनिधीच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाणार आहे. GUILD चे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूरने ट्विट करत याविषयीची माहिती दिली.

“करोना विषाणूमुळे प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. बरीचशी कामे  ठप्प झाली आहेत. सगळीकडचे कामकाज बंद झाल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाला या सगळ्याचा जास्त फटका बसत आहे. त्यामुळेच ‘प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने अशा व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कलाविश्वात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही मदतनिधीच्या माध्यमातून शक्य तितकी आर्थिक मदत करणार आहोत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना  मदत करण्याचा प्रयत्न करु, असं सिद्धार्थ रॉय कपूरने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा, विक्रमादित्य  आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीदेखील कलाविश्वातील कर्मचाऱ्यांप्रती चिंता व्यक्त केली होती. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्पॉइज (एफडब्ल्यूआईसीई), इंडियन फिल्म अँण्ड टेलिव्हिजजन डायरेक्टर्स असोसिएशन (आईएफटीडीए) आणि जीयूआयएलडी सह अन्य काही चित्रपट संस्थांनी करोना विषाणूचं संकट टळेपर्यंत १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत चित्रपट, मालिका, वेबसीरिज यांचं चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.