बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, जे बऱ्याच कालावधीपासून एकत्र आहेत मात्र त्यांच्या नातेसंबंधांवरून अनेकदा काही वाद समोर आले आहेत. या कपल्समधील प्रेमसंबंधासोबतच त्यांच्यातील वादाचीसुद्धा तेवढीच चर्चा बी-टाऊनमध्ये झाली.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग

rishi-and-neetu
बॉलिवूडच्या बहुचर्चित आणि सुपरहिट जोड्यांपैकी एक म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. गेल्या ३७ वर्षांपासून हे दोघे एकत्र आहेत. रियल लाइफमध्ये यांची जोडी जितकी हिट आहे, तितकीच रील लाइफमध्येही आहे. ९० व्या दशकात या दोघांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली आणि या वादाची तीव्रता नंतर इतकी वाढली की नीतूने ऋषीविरोधात घरगुती अत्याचाराअंतर्गत तक्रार दाखल केली आणि ती घर सोडून गेली. दोघांमधील वाद निवळल्यानंतर नीतू पुन्हा घरी परतली.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन

jaya-and-amitabh
यामध्ये दुसरी बहुचर्चित जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची. ‘जंजीर’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ आणि जया यांच्यातील प्रेमसंबंध फुलू लागले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या यशानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर एकीकडे जयाने चित्रपटात काम करणे बंद केलं तर दुसरीकडे अमिताभ बच्चन सुपरस्टार झाले. यादरम्यानच रेखासोबत बिग बींच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. जेव्हा रेखा या ऋषि कपूर आणि नीतूच्या लग्नात गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर लावून आल्या तेव्हा अमिताभ आणि रेखाने लग्न केल्याची बातमी जोरदार चर्चेत होती. मात्र यामध्ये काही सत्यता आढळली नाही. दोघांच्या अफेअरसंदर्भात माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत होत्या मात्र जया बच्चनने त्यांना फारसे महत्त्व दिले नाही. आज ४४ वर्षांनंतरही अमिताभ आणि जया एकत्र आहेत.

शाहरूख खान आणि गौरी खान

shah-rukh-and-gauri
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आणि गौरी यांनीही एकत्र २५ वर्ष पूर्ण केली. मात्र शाहरूख आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या होत्या. २००६ मध्ये ‘डॉन’ चित्रपटाच्या यशानंतर शाहरूख खान आणि प्रियांकाच्या जो़डीने २०११ मध्ये ‘डॉन-२’ चित्रपटात एकत्र काम केलं. यादरम्यानच दोघांच्या अफेअरची चर्चा माध्यमांतून समोर येऊ लागली. त्यामुळे शाहरूख आणि त्याची पत्नी गौरीमध्ये दुरावा निर्माण होऊन तिने घटस्फोट घेण्याचाही निर्णय घेतला होता असे म्हटले जाते. गौरीला समजावण्यात शाहरूखला यश मिळालं मात्र भविष्यात पुन्हा कधी प्रियांकासोबत काम न करण्याची तंबी गौरीने शाहरूखला दिली.

श्रीदेवी आणि बोनी कपूर

sridevi-and-boney-kapoor
श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. जून १९९६ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला. श्रीदेवीला तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना पाहिल्यानंतर बोनी कपूर तिच्या प्रेमात पडले होते. नंतर निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला हे एकतर्फीच प्रेम होतं. कारण श्रीदेवी तेव्हा मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नंतर श्रीदेवीची आई जेव्हा खूप आजारी होती, तेव्हा बोनी कपूर यांनी तिची खूप मदत केली. त्यानंतर श्रीदेवीने बोनी कपूर यांना होकार दिला.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी

dharmendra-and-hema
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमकहाणीतसुद्धा अनेक वादविवाद समोर आले. हेमा मालिनीचे कुटुंबिय धर्मेंद्रवरील तिच्या प्रेमाने नाखूष होते. धर्मेंद्र पंजाबी होते आणि त्यांचं लग्नही झालं होतं. त्यामुळे दोघांना लपून एकमेकांना भेटावे लागत होते. नंतर दोघांनी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा धर्मेंद्र आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार होते. मात्र त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरने घटस्फोट देण्यास नकार दिल्याचे म्हटले जाते. तेव्हा धर्मेंद्र यांनी मुस्लिम धर्म स्विकारून हेमा मालिनीशी लग्न केलं. यासाठी त्यांनी आपले नाव बदलून दिलावर खान असे नावदेखील ठेवले. लग्नानंतर हेमा मालिनी एकटी राहू लागली. अनेक प्रयत्नांनंतरही धर्मेंद्र हेमा मालिनीला आपल्या पहिल्या पत्नीसारखा दर्जा नाही देऊ शकले. मात्र ईशा आणि अहाना या दोन्ही मुलींच्या लग्नात त्यांनी हेमा मालिनीला साथ दिली.

दिलीप कुमार आणि सायरा बानो

dilip-and-saira
दिलीप कुमार यांचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेचा विषय ठरला. सायरा बानोशी लग्न केल्यानंतर १४ वर्षांनंतर त्यांनी पाकिस्तानी आसमां रहमानसोबत दुसरे लग्न केले. सायरा आई बनू शकणार नाही म्हणून त्यांनी दुसरे लग्न केल्याची तेव्हा चर्चा होती. १९८० मध्ये लग्न केल्यानंतर लगेच १९८२ मध्ये दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला आणि दिलीप कुमार पुन्हा सायराजवळ आले. सायरा या दिलीप कुमार यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान आहेत. मात्र त्यांच्यातील प्रेमामुळेच ते आजही एकत्र आहेत. त्यांच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत.