महाराष्ट्राच्या कडेकपारीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांचे सुर आजही गुंजत आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल आजवर बऱ्याच साहित्यातून आणि चित्रपटांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. याच सुवर्णमय इतिहासाची दखल आता बॉलिवूडनेही घेतल्याचं पाहायला मिळते. अभिनेता अजय देवगणने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. अजयचा हा आगामी चित्रपट अवघ्या काही क्षणांतच चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय झळकणार आहे.
मराठ्यांच्या इतिहासात तानाजी मालुसरेंच्या नावाचं वजन आणि योगदान पाहता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणं अनेकांसाठी सन्माननीय बाब आहे. अजयनेसुद्धा त्याच आदबीनं या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केलाय. ‘तो लढला… त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजींसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे’, असं कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार आणि आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगण पाहायला मिळत आहे. त्याशिवाय या पोस्टरमध्ये एक किल्लासुद्धा दिसत असून, त्यावर फडकणारा भगवाही लक्ष वेधत आहे. बरेच बारकावे लक्षात घेऊन साकारण्यात आलेल्या या फर्स्ट लूकने सध्या अनेकांची मनं जिंकली आहेत.
वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट
He fought for his People, his Soil & his King Chhatrapati Shivaji. The unsung warrior of glorious Indian history, Subedar Taanaji Malusare. pic.twitter.com/3qTWvKdbol
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 19, 2017
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत. तेव्हा आता अजयचा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. तेव्हा आता ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींची गाथा अनुभवण्यासाठी उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.