Dhadak Movie trailer launch जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या धडक सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीपासूनच या सिनेमाचे नाव सोशल मीडियावर ट्रेण्ड करत होते. अवघ्या मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना सैराट सिनेमाचा ओघवता प्रवास पाहतो की काय असेच वाटते. सिनेमाच्या संगीतापासून ते अनेक प्रसंग सैराट सिनेमातीलच आहेत. ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याचे संगीत असो किंवा त्यातील कोरिओग्राफी सर्व काही सारखेच आहे.

सिनेमाला राजस्थानची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या वर्गातील मुलांची प्रेमकथा यात मांडण्यात आली आहे. ट्रेलरची सुरूवातीला इशान जान्हवीला म्हणतो की तो तिच्यासाठी फार मोठं घर उभारेल. त्यावर जान्हवी म्हणते की तिला मोठ्या घरापेक्षा स्वतःचं घर हवंय. ट्रेलर पाहताना अनेक गोष्टी या मूळ सिनेमाशी साधर्म्य साधणाऱ्याच आहेत. अजय- अतुलने सिनेमाला संगीत दिले असल्यामुळे गाण्यांमध्ये आणि चालीमध्ये फारसा फरक दिसत नाही.

https://twitter.com/karanjohar/status/1006067529280868353

करण जोहरच्या धर्मा प्रोड्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खैतानने केले आहे. यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसत आहेत. येत्या २० जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. जान्हवीचा जरी हा पहिलाच सिनेमा असला तरी इशानने याआधी माजिद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’मध्ये काम केले आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाने १०० कोटींची कमाई केली होती. २९ एप्रिल २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा १०० कोटींची कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला होता. त्यामुळे येत्या काळात धडक सिनेमा किती कमाई करत आहे आणि या सिनेमात नवीन काय पाहण्यात येईल याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.