संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटाला सर्वच स्तरांतून भरभरुन प्रतिसाद मिळत असताना, अभिनेत्री स्वरा भास्करने मात्र या चित्रपटाविषयी आपलं मत मांडत अनेकांच्या भुवया उंचावल्या. स्वराने एका ओपन लेटरच्या माध्यमातून या चित्रपटाविषयी आपले मत मांडले. ज्यामधून तिने चित्रपटातील काही दृश्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर नेटकऱ्यांनी स्वराला चांगलेच घेरले आणि तिच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. आता ‘पद्मावत’मधील कलाकारांनीही स्वराच्या पत्राविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना दीपिकाने आपले मत मांडले. ‘तिने (स्वराने) चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात येणारे डिस्क्लेमर पाहिले नसावे. तू पॉपकॉर्न घेण्यासाठी बाहेर गेली असणार आणि तेव्हाच डिस्क्लेमर निघून गेले असणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातून जो काळ साकारण्यात आला आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवे होते आणि शेवटची गोष्ट म्हणजे, हा चित्रपट म्हणजे सर्व राजपूत महिलांनी केलेल्या जौहरचीच गाथा नसून, त्याहीपलीकडे बऱ्याच गोष्टी या चित्रपटात साकारण्यात आल्या आहेत. माझ्यालेखी हा चित्रपट म्हणजे महिलांची धाडसी वृत्ती, त्यांची ताकद आणि सन्मान या सर्व गोष्टींचा मेळ साधणारा एक अनोखा नजराणाच आहे’, असे दीपिका म्हणाली.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

एकीकडे दीपिकाने स्वराने लिहिलेल्या ‘त्या’ पत्राविषयी आपले मत ठामपणे मांडले असले, तरीही रणवीर आणि शाहिदने मात्र याविषयी फार काही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. पण, स्वराच्या एका पत्रामुळे सोशल मीडिया आणि कलाविश्वात ‘पद्मावत’विषयीच्या नव्या वादाला तोंड फुटले हेच खरे.