जानेवारी महिना बॉलिवूडच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, याच महिन्याच्या २५ तारखेला दोन तगडे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ आणि आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांसमोर आता मोठा पेच उभा राहिला आहे. या दोन्ही चित्रपटांची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या बॉक्स ऑफिस कमाईविषयी बरेच अंदाज वर्तवण्यात येत होते. पण, एकाच दिवशी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे ही सर्व समीकरणे बदलली आहेत.

१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘पद्मावत’च्या मार्गात अडथळे आल्यामुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. पण, आता मात्र भन्साळींचा बिग बजेट ‘पद्मावत’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या चित्रपटाचा खिलाडी कुमारच्या ‘पॅडमॅन’च्या कमाईवर परिणाम करणार असेच चित्र दिसत आहे. खुद्द ट्विंकल खन्नाही या दोन्ही चित्रपटांमध्ये उदभवलेल्या या परिस्थितीविषयी चिंतीत आहे. ‘पद्मावत’ची एकंदर लोकप्रियता आणि चित्रपटामुळे झालेल्या वादांच्या मुद्द्यामुळे निर्माण झालेलं वातावरण पाहता प्रेक्षकांचा कल याच चित्रपटाकडे जास्त दिसत आहे. अक्षयचा ‘पॅडमॅन’ही आपल्या प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी झाला असला तरीही काही प्रमाणात मात्र प्रेक्षक विभागले गेल्याचे नाकारता येणार नाही, असेच मत काही चित्रपट समीक्षकांनी मांडले आहे. मुख्य म्हणजे ज्या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ला विरोध केला जातोय, त्या ठिकाणी मात्र ‘पॅडमॅन’च्या कमाईला गती मिळू शकते हा अंदाजही वर्तवण्यात येतोय.

वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!

चित्रपट विश्लेषक अतुल मोहन यांनी ‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना याविषयीची गणितं मांडली. “भन्साळींचे दिग्दर्शन असलेल्या ‘पद्मावत’च्या पहिल्या दिवसापासूनच या परिस्थितीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये पद्मावतला प्रवेश नाही. बहुधा इतरही काही राज्य येत्या काळात अशी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे ज्या ठिकाणी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत तेथेच ‘पॅडमॅन’ला तगडे आव्हान मिळणार आहे. ‘पद्मावत’मुळे करणी सेनेची आक्रमक भूमिका पाहता चित्रपटगृहाच्या मालकांमध्येही सध्या भीतीचे वातावरण आहे. तेव्हा ही एकंदर परिस्थिती पाहता पद्मावत अगदी शांततेच्या वातावरणात प्रदर्शित झाला तर, ‘पॅडमॅन’च्या नफ्यात अंदाजे ३० टक्क्यांनी घट होऊ शकते”, असे ते म्हणाले.

वितरक राजेश थडानी यांनीसुद्धा पद्मावतीच्या बाजूने कौल देत, ‘पॅडमॅन’च्या नफ्यात २० ते ३० टक्क्यांनी घट होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. तर प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी मात्र पद्मावत आणि ‘पॅडमॅन’ प्रदर्शित झाल्यानंतर दोन्ही चित्रपटांमध्ये तोट्याचे समान विभाजन पाहायला मिळेल असे मत मांडले आहे. तेव्हा आता येत्या काळात कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.